घरमहाराष्ट्रहरिश्चंद्रगडावर अडकलेले ट्रेकर्स उतरायला सुरुवात...

हरिश्चंद्रगडावर अडकलेले ट्रेकर्स उतरायला सुरुवात…

Subscribe

आज पहाटे उजाडल्यानंतर अडकलेल्या वीसही ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरुन उतरण्यास सुरुवात केली आहे.

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगला गेलेले २० ट्रेकर्स वाट चुकल्यामुळे रविवारी संध्याकाळपासून गडावरच अडकून होते. मात्र, ताज्या माहितीनुसार या २० ट्रेकर्सना मार्ग सापडला असून त्यांनी गड उतरायला सुरुवात केली आहे. आज सकाळी कोकणकड्याच्या सुळक्यावरुन त्यांनी गड उतरायला सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी अंधार पडल्यानंतर या ट्रेकर्सना खाली उतरण्याचा मार्ग सापडत नव्हता. इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या बचाव कार्याला सुरुवातही करण्यात आली होती. अखेर आज पहाटे उजाडल्यानंतर अडकलेल्या वीसही ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडावरुन उतरण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ५०० मीटर उंचीचा कोकणकडा उतरुन हे ट्रेकर्स आपल्या बेस कॅंपपर्यंत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोकणकडा उतरल्यानंतर पुढे आणखी एक ३०० मीटरचा सुळका पार करतील आणि त्यानंतर पुढे साधारण ६ ते ७ तास चालून आपल्या बेस कँपवर पोहचतील. दरम्यान, अन्य ट्रेकर्सही त्यांच्या मदतीसाठी तिथे पोहचल्याचे समजते आहे.

नेमका प्रकार काय…

माळशेज घाट येथील हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी २० जणांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या ठिकाणाहून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १००० फूट खाली सर्व ट्रेकर अडकले होते. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांनादेखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सच्या सुटकेसाठी मदत करण्यास सांगितले होते. ठाणे जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत ५ महिला व १७ पुरुष आहेत. काल हे ट्रेकर्स अडकलेल्या ठिकाणी अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडणे कठीण होऊन बसले होते. या अंधारामुळेच बचाव पथकालाही आपले काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्या २० ट्रेकर्सना रात्र तिथेच काढावी लागली. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसंच जुन्नर पोलीसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर, प्रशासनाच्या मदतीने बचावकार्याला प्रारंभ झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -