घरमहाराष्ट्र२५ हजार लिटरची पाण्याची टाकी फुटली

२५ हजार लिटरची पाण्याची टाकी फुटली

Subscribe

दोन कामगार सुदैवाने बचावले

नुकत्याच घडलेल्या ओएनजीसी दुर्घटनेनंतर तालुक्यातील अग्निशमन यंत्रणांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच बुधवारी रात्री जेएनपीटीच्या हॉस्पिटलमधील अग्निशमन पंप हाऊसची 25 हजार लीटरची टाकी फुटली. टाकीतील पाणी संपूर्ण पंप हाऊसमध्ये भरले व पाण्याच्या दाबामुळे पंप हाऊसची भिंतदेखील वाहून गेली. वीज प्रवाह या पाण्यामध्ये उतरला नसल्याने दोन कामगार सुदैवाने बचावले.

हॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणेसाठी बाजूलाच पंप हाऊस आहे. यामध्ये पाण्यासाठी 25 हजार लीटरच्या चार प्लास्टिकच्या टाक्या बसविल्या आहेत. रात्री त्यापैकी एक टाकी फुटली, तर दुसर्‍या टाकीला धक्का बसल्यामुळे त्यातूनही गळती सुरू झाली. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या या टाक्या असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. नुकताच या अग्निशमन यंत्रणेसाठी जेएनपीटीने साडेचार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र हे काम अत्यंत सुमार पद्धतीचे झाले आहे. अग्निशमन यंत्रणेसाठी वापरण्यात आलेले पाइप आणि त्याचे वेल्डिंग तकलादू आहे.

- Advertisement -

ठेकेदाराने भरपूर फायदा कमावण्यासाठी जेएनपीटीच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून हे काम केले आहे. येथे फायर ब्रिगेडचे काम करणार्‍या कामगारांना प्राथमिक सोयीसुविधाही देण्यात येत नाहीत. पगार आणि भत्ते नियमाप्रमाणे मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच या निकृष्ट कामामुळे भविष्यात हॉस्पिटलमध्ये आग लागल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

या बाबत जेएनपीटी अग्निशमन विभागाचे मुख्य संजय सक्सेना यांच्याकडे विचारणा केली असता या घटनेमुळे चिंता करण्याचे कारण नाही. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्व चांगल्या प्रतीचे साहित्य वापरले आहे. येथील कामगारांना अग्निशमनाबाबत काही कळत नसल्यामुळे ते अशा प्रकारची नेहमी ओरड करत असतात, असा दावा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -