घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेंच्या गृहखात्यावर जयंत पाटील आणि अजित पवारांचा डोळा

एकनाथ शिंदेंच्या गृहखात्यावर जयंत पाटील आणि अजित पवारांचा डोळा

Subscribe

सध्या गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे खाते स्वतःकडे यावे, यासाठी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.

एकीकडे राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र गृहखात्यावर अडून बसली आहे. आज झालेल्या मुख्यमंत्री आणि शदर पवार यांच्या दिड तास झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडील गृहमंत्री पद सोडण्यास ठाम नकार दिल्याचे वृत्त आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतांना कोणत्या पक्षाकडे कोणती खाती असावीत याबाबत सविस्तर चर्चा तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींमध्ये झाली होती. त्यानुसार नगरविकास आणि गृह ही दोन्ही खाती शिवसेनेकडे राहतील असे ठरले होते. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी गृहखाते ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाला अधिक मदत होते. शिवसेनेकडे गृहखाते असल्यास सेनेला त्याचा अधिक लाभ होईल हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गृहखाते राष्ट्रवादीकडे घेण्याचा आग्रह शरद पवार यांच्यांकडे धरला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यांबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे वादग्रस्त ठरलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी शरद पवारांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचे बोलले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले जाईल असे निश्चित समजले जात आहे. मात्र अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहखातेही हवे आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्या अर्थ मंत्री असलेले जयंत पाटील यांचे मन अर्थ खात्यात रमत नसल्याने त्यांनाही गृहखाते हवे आहे. राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांना गृहखाते हवे असल्याने शिवसेनेची मात्र कोंडी झाली आहे. तसेच शरद पवार यांच्याही पुढे पेच उभा ठाकला आहे.

- Advertisement -

वास्तविक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रारंभी मुख्यमंत्री होण्यास अनुकूलता दाखवली नव्हती. उद्धव यांनी शिवसेना नेते संजय राऊत अथवा शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले होते असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. मात्र या दोन्ही नावांपेक्षा शरद पवार यांनी उद्धव यांनाच मुख्यमंत्री होण्याचा आग्रह धरला त्यामुळे त्यांचा आदेश प्रमाण मानत अखेर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र यामुळे सत्तास्थापनेच्या नाट्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेल्या एकनाथ शिंदे यांना गृहखाते देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या बैठकीत गृह व नगरविकास ही दोन्ही खाती शिवसेनेकडे राहतील याची काळजी घेतली होती.

पण आता मात्र गृहखात्याचा राजकारणातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन अजितदादा आणि जयंत पाटील हे दोघेही गृहखाते राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी शरद पवारांना आग्रह करत आहेत. मात्र असे असले तरी गृहखाते सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी ठाम नकार दिला असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात गृहखाते नेमके शिवसेनेकडे राहते की राष्ट्रवादीकडे जाते याबाबत उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -