घरमहाराष्ट्रऔरंगाबादमध्ये वंचित आघाडीचा उमेदवार नाही, फक्त पाठिंबा!

औरंगाबादमध्ये वंचित आघाडीचा उमेदवार नाही, फक्त पाठिंबा!

Subscribe

काँग्रेसने बी. जी. कोळसे पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, तर या जागेवर ना काँग्रेसचा उमेदवार असेल ना राष्ट्रवादी काँग्रेसचा. २०१४च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना कडवी टक्कर देत काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांनी तब्बल ३ लाख ५८ हजार ९०२ मतं मिळवली होती. मात्र, गेल्याच महिन्यात पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेससोबत चर्चा फिस्कटल्यानंतर बहुजन वंचित आघाडीचे प्रणेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं. पण औरंगाबादमध्ये भारिप किंवा एमआयएम या दोन्हींपैकी कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र जनता दलाचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये औरंगाबादचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडी कोळसे पाटलांना फक्त पाठिंबा देणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीचा फक्त पाठिंबा

११ मार्च रोजी औरंगाबादमध्ये वंचित विकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सभेमध्ये स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. मात्र त्यावेळी महाराष्ट्र जनता दलाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र जनता दलाकडूनच पक्षाचे औरंगाबादमधले अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे कोळसे पाटील त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या नसून जनता दलाच्या तिकिटावर लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देणार आहे.

- Advertisement -

कोळसे पाटलांना काँग्रेसही पाठिंबा देणार?

दरम्यान, बी. जी. कोळसे पाटील जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्यामुळे काँग्रेस देखील त्यांना औरंगाबादमध्ये पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दलाचं आघाडीचं सरकार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस औरंगाबादमधल्या जनता दलाच्या उमेदवाराला नक्कीच पाठिंबा देण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यामुळेच कोळसे पाटलांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

बी. जी. कोळसे पाटलांवर #MeToo प्रकरणात आरोप

एक माजी न्यायमूर्ती म्हणून बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांची प्रतिमा आयुष्यभर स्वच्छ ठेवली आहे. मात्र, २०१८ मध्ये एका महिला पत्रकाराने कोळसे पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचे आरोप लावले होते. या पत्रकाराने त्यासंदर्भात ट्वीट करून हे खळबळजनक आरोप जाहीर केले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -