घरमहाराष्ट्रआदिवासींचा प्रवास दगड-धोंड्यांतून!

आदिवासींचा प्रवास दगड-धोंड्यांतून!

Subscribe

रस्त्यांना कुणी वाली नाही

कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी बहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्या-पाड्यांना जोडणार्‍या रस्त्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी ढुंकुनही पाहत नसल्याने आदिवासींचा प्रवास दगड-धोंडे तुडवत सुरू आहे.आदिवासींना उपजीविकेसाठी शेती व्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणार्‍या रानभाज्या जमा करून शहरातील बाजारात विक्रीसाठी घेऊन जावे लागते. मात्र खराब रस्त्यांमुळे कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावा लागतो.

काही ठिकाणी तर 20 ते 25 वर्षे रस्त्यांची कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळवाडी, हर्‍याची वाडी, नवसूची वाडीे, ताडवाडी-कुरूंग, पोशीर हद्दीतील गिर्‍याची वाडी, वाघाची वाडी, झेंडे वाडी, देवपाडा, चिंचवाडी-वंजार पाडा, वाघाची वाडी, गुढवण वाडी, ओलमण-कोतवाल वाडी आणि चिंचवाडी, मोहपाडा, धानकी, याशिवाय नेरळ शहरापासून जवळच्याच अंतरावर असलेल्या पाली-भुतिवली वाडी, पाली चिंचवाडी, सागाची वाडी, अशाणे वाडी, बोरीची वाडी, धामण दांडा या वस्त्यांवर जायला पायवाटे शिवाय पर्याय नाही.

- Advertisement -

अशीच स्थिती बेडीस गाव जवळील वाघिणीची वाडीची आहे. डोंगराळ भागात सुमारे 52 घरांची वस्ती असलेल्या या आदिवासी वाडीतील लोकांना पायवाटेने जा-ये करावी लागते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते ऊन, पाऊस, काळोखात या खडतर मार्गावरून चालत जात-येत असल्याने त्यांना आता तरी आमच्या व्यथा समजतील अशी भावना तेथील आदिवासी बोलून दाखवत आहेत. खेदाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. पावसात काही रस्ते वाहूनही गेले आहेत. करोडो रुपये खर्च होऊनही रस्ते मात्र दगडांचे अशी तेथील अवस्था आहे.

बेडीस गावाजवळ डोंगराळ भागात वसलेल्या वाघिणीची वाडी येथे आजही रस्ता आणि पाण्यासाठी गावकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. वाडीत जाण्यासाठी पायवाट आहे, पण दोन्ही बाजूने वाढलेले जंगल आणि निसरड्या रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत.
-प्रदीप कुलकर्णी, अध्यक्ष, साथ फाऊंडेशन

- Advertisement -

20 वर्षे वाडीचे रस्ते झाले नाहीत. खराब रस्त्यामुळे गाड्या येत नाहीत. सरकारचे आदिवासी भागात लक्ष नाही.
-यशवंत शिवाजी कैवारी, जांभूळवाडी ग्रामस्थ

चिंचवडी-देवपाडा रस्त्याची अवस्था दयनीय आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे प्रवासात त्रास होतो. वाहनांचाही खुळखुळा झाला आहे.
-भगवान मंगल भगत, चिंचवाडी ग्रामस्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -