घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आता खाकी ऐवजी 'कलरफुल गणवेश'

मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आता खाकी ऐवजी ‘कलरफुल गणवेश’

Subscribe

मुंबई : मुंबई शहर व उपनगरे या ठिकाणी सफाई काम करणाऱ्या महापालिकेतील सफाई कर्मचारीं वर्षानुवर्षे वापरत असलेला खाकी गणवेश आता बदलणार आहे. या सफाई कर्मचाऱ्यांना नवीन कलरफुल गणवेश देण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यासाठी आज, बुधवारी प्रायोगिक तत्वावर बुधवारी पालिका मुख्यालयाच्या ठिकाणी ‘ए’ विभागातील सहा सफाई कर्मचाऱ्यांना हा नवा गणवेश देण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली की, सफाई कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.

राज्यात दहा महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप झाला व सत्तांतर होऊन सरकार बदलले. त्यानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईचा कायापालट करण्याची घोषणा केली. तब्बल 1,720 कोटी रुपयांचा निधी वापरून मुंबईला स्वच्छ, सुंदर मुंबई बनविण्याचा संकल्प नवीन मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडला आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना, पुढील काही कालावधीत मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा आहे. भरीव विकास कामे करून मुंबईकरांची मने जिंकून मुंबई महापालिकेची आगामी निवडणूकही जिंकण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष्य आहे. शहर व उपनगरे येथील 24 विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील रस्ते, चौक व परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम पालिकेतील 27 हजार सफाई कर्मचारी करतात. हे सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून खाकी गणवेश वापरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईतील विकासकामे, सुशोभीकरण आदी कामांत स्वतः जातीने लक्ष घालीत आहेत. कदाचित महापालिकेतही मुख्यमंत्री शिंदे यांना काही बदल अपेक्षित असावा, याच दृष्टिकोनातून पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय झाला असावा.

- Advertisement -

पालिकेने प्रायोगिक तत्वावर कलरफुल गणवेशाचे काही नमुने मागवले आहेत. बुधवारी पालिकेच्या ‘ए’ विभागातील तीन पुरुष व तीन महिला सफाई कर्मचारी यांना कलरफुल गणवेश वाटप करण्यात आले. त्यापैकी तीन सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन कलरफुल गणवेश परिधान करून संबंधित अधिकाऱ्यांसमोर त्याचे सादरीकरण केले. या सफाई कर्मचाऱ्यांना नवीन कलरफुल गणवेश व सोबत नवीन सेफ्टी शूजही देण्यात आले आहेत. आता या नवीन गणवेशाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास, त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसे झाल्यास मुंबईतील खाकी गणवेशातील सफाई कर्मचारी कलरफुल गणवेशात मुंबईत चमकताना दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -