घरताज्या घडामोडीमुंबईकरांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, दीपक केसरकरांची ग्वाही

मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, दीपक केसरकरांची ग्वाही

Subscribe
मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक सुविधा देऊन जगातील अग्रेसर व सुलभ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईकरांना दिली आहे.
मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. सायन कोळीवाडा, धारावी, किंग्ज सर्कल या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे पूर्व-पश्चिम असा रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा उपयोग होईल. विशेष म्हणजे, जेष्ठ नागरिकांना उपयुक्त असे सरकते जिने (एस्कलेटर) असणारा मुंबईतील हा पहिलाच पादचारी पूल आहे.
याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आ. कालिदास कोळंबकर, आ. कॅप्टन तमिल सेल्वन, आ. प्रसाद लाड, उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, माजी नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

न्यूयॉर्कच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा बसगाड्यांद्वारे खास सुविधा  

मुंबईतील नागरिकांना तसेच जेष्ठांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. न्यूयॉर्क येथील जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील जेष्ठ नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईतील जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या सुविधेकरिता बेस्ट उपक्रमाकडून दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बसेस देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

महिलांना रोजगारासाठी जागा देणार, लोअर परळ येथे एसी मार्केट

राज्य शासनाने आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंडया आणि कोळीवाड्यांचा विकास यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. महिलांना रोजगार, व्यवसायासाठी जागा पुरविण्यात येणार आहे. तसेच, मार्केटमध्ये अधिक दर्जेदार सुविधा देण्याच्या अनुषंगाने भाग म्हणून लोअर परळ येथे एसी मार्केट उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच, मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या नाविण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईतील कोळीवाड्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून ‘फूड ऑन ट्रक’ची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

शीव (सायन) येथील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाबाबत माहिती 

मुंबई शहरात पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी शीव पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बांधावा, अशी एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार शीव येथे हा पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, धारावी, गांधी मार्केट या परिसरात ये-जा करणार्‍या नागरिकांना फायदा होणार आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण 44 मीटर लांबीचा तर 4.15 मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान 7 हजार ते 8 हजार नागरिक या पुलाचा वापर करतील, असा अंदाज आहे. सदर पूल उभारण्यासाठी 5.63 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

विविध अडचणींमुळे पूल उभारण्यासाठी ५२ महिन्यांचा कालावधी  

कोरोना काळातील ताळेबंदी, सरकते जिने पुरवठादाराकडून झालेला विलंब, वृक्ष प्राधिकरण आणि वाहतूक विभागाची परवानगी अशा अनेक आव्हानांना सामोरे जात या पुलाचे काम 52 महिने कालावधीत पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पादचाऱयांना सुरक्षितता लाभून रस्त्यांवर होणारे अपघात टाळणेही शक्य होणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यासाठी देखील या पुलाची मदत होणार आहे.

हेही वाचा : माळशेजघाटासह पावसाळी पर्यटन स्थळावर 144 कलम लागू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -