घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Subscribe

मी येथे येईन म्हणालो नव्हतो तरीही आलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना चिमटा

मी येथे येईन असे कधीच म्हटले नव्हते; पण आयुष्य म्हणजे रंगभूमी आहे. येथे कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

यापुढे विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असे मी म्हणेन. कारण विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांची रविवारी विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली. यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजीदेखील केली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.

- Advertisement -

मी असा पहिलाच मुख्यमंत्री आहे, ज्याच्या समोरचा विरोधी पक्ष त्याचा ३० वर्षे जुना मित्र आहे आणि सोबत असलेले सहकारी आतापर्यंतचे राजकीय विरोधक आहेत. विरोधी पक्षात बसलेल्यांना मी विरोधक समजत नाही. कारण ते माझे मित्रच आहेत. तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवली नाही आणि यापुढेही लपवणार नाही,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काल मी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय बोललो, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र बंद दाराआड आणि कानात काय बोललो ते सांगण्याची आमची संस्कृती नाही, असे म्हणत उद्धव यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांना टोला लगावला. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सहकार्य कराल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता. मला येथे यावे लागले नसते. कारण इथे येईन असे मी कधीच म्हटले नव्हते, असा चिमटा उद्धव यांनी काढला.

- Advertisement -

शेतकर्‍यांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यासाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली असून अधिक मदतीची गरज आहे. केंद्र सरकारने जास्तीत जास्त निधी देण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शेतकर्‍यांच्या या प्रश्नावर आपण लवकरच पंतप्रधान नरेद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

विधिमंडळाचे विशेष अधिवेशनाची रविवारी सांगता झाली. त्यानंतर विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील घोषणा केली. परिस्थिती बदलली आहे. मी कधी इथे येईन असे मला वाटले नव्हते, तुम्हालाही वाटले नसेल, मी सकाळी विधानसभेमध्ये भाषण केले नाही, मनोगत व्यक्त केले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

सध्या राज्यात सुरू असलेल्या विकासरकामांचा आढावा मागितला आहे. यात कोणकोणती विकासकामे सुरू आहेत त्याची पूर्ण माहिती मागवली आहे. या विकासकामांचा प्राधान्य क्रम लावायचा आहे. काही विकासकामे ही कदाचित तातडीची नसतील तर काही असतील. हा सगळा आढावा आपण घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मैं समंदर हूँ, लौटकर जरूर आऊंगा – अभिनंदनाच्या ठरावावर फडणवीस यांचे उत्तर

मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा, असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. मी पुन्हा येईन म्हटले होते. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा आणले. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिले. पण जनादेशाचा सन्मान आपण ठेऊ शकलो नाही. सत्तर टक्के गुण मिळवूनही मेरिटमध्ये आलो नाही. चाळीस टक्के गुण मिळवणारे तिघे एकत्र आले आणि १२० टक्क्यांची मेरिट देऊन सत्ता मिळवली, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या ठरावाला देवेंद्र फडणवीस यांनी अशी मार्मिक उत्तरे दिले.

अभिनंदनाचे ठराव चांगलेच होते, काही भाषणे अशी होती त्यामध्ये खोचक कौतुक करण्यात आले. मी पुन्हा येईन म्हटले होते. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा आणले. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिले. पण जनादेशाचा सन्मान आपण ठेऊ शकलो नाही. लोकशाहीत अशा गोष्टी होत असतात. मी पुन्हा येईन सांगितले; पण टाइमटेबल सांगितले नव्हते म्हणून काही वेळ वाट बघा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती; पण काल दुर्दैवाने करता आली नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय, प्रेमाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध राजकारणापलीकडे असतात. त्यांच्या मनात जनतेकरिता ज्या योजना केल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे जनतेच्या हिताचे आहे, त्यासाठी नक्कीच सहकार्य करू. विरोधी पक्षात काम करणे हा आमचा डीएनए आहे, नियम पुस्तिकेच्या बाहेर मी कधीच गेलो नाही. संविधानाच्या आधारे काम करतो. सभागृहात जे मुद्दे काल मांडले ते संविधानाच्या आधारे मांडले. अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करता येत नाही, पण त्यांच्या निर्णयाने समाधान झालं नाही म्हणून सभात्याग केला, असे फडणवीस म्हणाले.

नियमांचे पुस्तक आणि संविधान यापुढे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही. कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास मनाई नाही. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही काम केले. बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावे वंदनीयच आहेत. ही नावे कधीही घ्या. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे, त्या अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण शपथ घेताना संविधानाची तरतूद पाळली नाही.

जेव्हा जेव्हा नियमाला धरून काम होणार नाही. कितीही चिडला, कितीही रागवला तरीही मला दिलेली जबाबदारी ही नियमाला धरून, संविधानाला अनुसरुन काम करत राहणार आहे असे ठणकावून सांगत फडणवीसांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले.

संविधानामध्ये इतकी शक्ती आहे. त्याची ताकद खूप मोठी आहे. विरोधी पक्ष शत्रू नाहीत तर वैचारिक विरोध म्हणून आपण इथे बसलो. जे मित्र होते ते एकमेकांसमोर बसले आहेत. जे विरोधात होते ते सत्तेत बसले आहेत. लोकांनी जनादेश आम्हाला देऊनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही; पण ४० टक्के मार्क मिळून तिघे एकत्र आले आणि १२० टक्के सांगितले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्‍यांना लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही कधीही आवाज द्या, आमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. जनतेच्या हिताविरोधात असेल तर सरकारवर आसूड ओढण्याचे काम नक्कीच करणार आहोत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -