घरमहाराष्ट्रतांबे भाजप पुरस्कृत उमेदवार? योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस

तांबे भाजप पुरस्कृत उमेदवार? योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस

Subscribe

भाजपने नाशकात एकही उमेदवार न उतरवल्याने भाजप अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना पाठिंबा देऊन भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर नेता म्हणून, व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून सत्यजित तांबे यांचे काम निश्चितपणे चांगले आहे, परंतु सर्व राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे करावे लागतात. त्यामुळे योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी गुरुवारी सांगिल्याप्रमाणे ते योग्य निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज न भरता पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज भरण्यास वाट मोकळी करून दिली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या कृत्यामुळे तांबे पिता-पुत्रावर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे या मतदारसंघासाठी भाजपने एकही उमेदवार जाहीर न केल्याने हा भाजपचा प्लॅन होता, असे म्हटले जात आहे, असे विचारले असता भाजपने स्वतःचा उमेदवार देणे जाणीवपूर्वक टाळले असे नाही.

- Advertisement -

आमची मनापासून अशी इच्छा होती की नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी. त्याबाबत राजेंद्र विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा सुरू होती, परंतु काही कारणाने त्यांनी असमर्थता दाखवली. असे कोणतेही गणित आम्ही घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरूर गेलो होतो, पण त्याला बाळासाहेब थोरात आणि सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे काही नवीन नाही. हा घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील, अशी सूचक माहितीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नसेल – पटोले
आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली. आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरून भाजपचा पाठिंबा असल्याचे दर्शवले. बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा नसेल. याबाबत कारवाईचा निर्णय हायकमांडच घेतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेस एक बुडते जहाज – बावनकुळे
काँग्रेस एक बुडते जहाज असून त्यांनी स्वत:चीच माणसे सांभाळावीत. अमित देशमुख यांनी मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे, असे सांगितले असले तरी तो काळ ठरवेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले. सत्यजित तांबे यांनी अजूनही आमच्याकडे पाठिंबा मागितलेला नाही. आमच्याकडे आल्यास हा विषय आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे जाईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -