घरमहाराष्ट्र१३२ वर्षे पूर्ण झाली; जीवघेणा प्रवास कधी थांबणार?

१३२ वर्षे पूर्ण झाली; जीवघेणा प्रवास कधी थांबणार?

Subscribe

डोंबिवली रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण झाली. पण डोंबिवलीकरांचा जीवघेणा प्रवास अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा जीवघेणा प्रवास नेमका कधी थांबणार? असा प्रश्न डोंबिवलीकर प्रवाशांना पडला आहे.

सर्वाधिक गर्दीचं आणि उत्पन्न देणारं स्थानक म्हणून डोबिवली रेल्वे स्थानक ओळखलं जातं. १ मे महाराष्ट्र दिनी डोंबिवली रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण झाली. पण डोंबिवलीकरांचा जीवघेणा प्रवास अजूनही सुरूच आहे. लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आतापर्यंत लोकलमधील गर्दीमुळे भावेश नकाते, धनश्री गोडवे, नितेंद्र यादव आणि रविकांत चाळकर आदी प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार? असा प्रश्न डोंबिवलीकर प्रवाशांना पडला आहे.

डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक

मुंबई ते ठाणे हा रेल्वे मार्ग १६ एप्रिल १८५३ ला सुरू झाला. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी म्हणजेच १ मे १८८७ रोजी डोंबिवली रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. अनेक वर्ष डोंबिवली रेल्वे स्थानकाचा फलाटही लाकडी होता. तसेच शिडी लावूनच प्रवाशांना गाडीत चढावे आणि उतरावे लागत होते. १९२७ मध्ये सध्याचे तीन आणि चार असे दोन फलाट बांधण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू डोंबिवली रेल्वे स्थानकाचा विकास झाला. सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून डोंबिवलीचा नंबर लागतो.

- Advertisement -

प्रवाशी सोयी सुविधांपासून वंचित

डोंबिवली स्थानकातून दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असून दरमहा १५ कोटीच्या आसपास उत्पन्न आहे. इतकं उत्पन्न मिळूनही प्रवाशी सोयी सुविधांपासून वंचितच आहेत. कल्याण दिशेकडील डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धोकादायक ब्रीज तोडून नवीन बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र रेल्वे स्थानकातील लिफ्ट बंद असल्याने वयोवृध्द प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. अपंगासाठी फलाट क्रमांक १ वरील स्वच्छतागृह बंद असल्याने अपंगांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. ‘महिला स्पेशल’ ही गाडी कल्याणहून सुटते. मात्र कल्याणला ही लोकल पूर्णपणे भरत असल्याने डोंबिवलीतील महिला प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सकाळच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून महिला स्पेशल लोकल सोडण्यात यावी, अशी महिला प्रवाशांची मागणी आहे. गेल्या वर्षी रेल्वे अपघातात १५७ जणांनी जीव गमावला असून ९१ जण जखमी झाले आहेत. सकाळच्यावेळी डोंबिवलीत लेाकलमध्ये चढणे आणि उतरणे हे मोठं दिव्य साहसच समजलं जात. लोकलमधील डब्ब्यात पाय ठेवणेही मुश्किल होऊन जाते. गर्दीचा सामना करीतच लटकून अनेक प्रवाशांना प्रवास करावा लागतो आणि प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डोंबिवली लोकल वाढविण्याची मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -