घरमुंबईकल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान; आगरीकार्ड कुणाच्या पारड्यात पडणार

कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान; आगरीकार्ड कुणाच्या पारड्यात पडणार

Subscribe

आगरी समाजाची मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांनीही चांगलीच कंबर कसली होती.

आगरी मतांचे राजकारण रंगलेल्या कल्याण ग्रामीण परिसरात सर्वाधिक १ लाख ८८ हजार २१६ इतके मतदान झाले आहे. आगरी समाजाची मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांनीही चांगलीच कंबर कसली होती. त्यामुळे आता सर्वाधिक मतांचे आगरी कार्ड कुणाच्या पारड्यात पडणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याणमध्ये सर्वाधिक मतदान

कल्याण ग्रामीण परिसरात आगरी समाजाची वस्ती मोठया प्रमाणात आहे. कल्याण ग्रामीणमध्ये ४६. ६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या १ लाख ८९६२ तर महिला मतदारांची संख्या ७९ हजार २४१ इतकी आहे. पाटील हे आगरी समाजाचे, स्थानिक उमेदवार असल्याने त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकार विषयीची नाराजी शिंदे यांना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

स्थानिक भूमिपुत्र सरकारवर नाराज

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, जेएनपीटी ते दिल्ली फ्रेडकॉरीडॉर, ग्रोथ सेंट आणि समृध्दी महामार्ग अशा विविध प्रकल्पात स्थानिक भूमीपुत्रांच्या जागा बाधित होत असल्याने सरकारविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे. तसेच केडीएमसीतील २७ गावाची स्वतंत्र नगरपालिकाचे आश्वासन आणि १० गावांमध्ये ग्रोथ सेंटर आणि ५ गावांवर टीपी स्कीम यामुळे शेतक-यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आल्याने शेतक-यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसऱ्या महायुध्दाच्यावेळी संरक्षण खात्याने अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी विमानतळासाठी स्थानिक शेतकऱ्यांची जागा घेतली होती. मात्र स्वातंत्र्यानंतरही त्या जागा परत न केल्याने भूमीपुत्रांनी हिंसक आंदोलन केले होते. त्यात स्थानिक भूमिपुत्रांना तुरूंगात टाकण्यात आले होते. याविषयी भूमीपुत्रांमध्ये सरकारविरोधात रोष आहे.

२३ मे ला चित्र होणार स्पष्ट

सरकारविरोधात नाराज आगरी कोळी भूमीपुत्र महासंघाने आगरी समाजाने स्थानिक उमेदवार बाबाजी पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी निळजे गावात आगरी समाजाचा मेळावाही पार पडला. तर दुसरीकडे आगरी समाजातील शिवसेना व भाजपची स्थानिक नेतेमंडळी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनीही एकजूट करून शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यासाठी माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाजाचा भव्य मेळावा पार पडला होता. त्यामुळे आगरी समाजाची मते मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच लढाई रंगल्याचे दिसून आले. आता ग्रामीण परिसरात सर्वाधिक पावणेदोन लाख मतदान झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आगरी कार्ड हे पाटील कि शिंदे कुणाच्या बाजूने उभे राहते हे २३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

महिला मतदारांमध्ये निरुत्साह

दरम्यान, मतदानाचा टक्क वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र त्याचा फारसा परिणाम कल्याण लोकसभा मतदार संघात दिसून आलेला नाही. कल्याणातील मतदानाची टक्केवारी घसरली असतानाच, महिला मतदारांमध्ये निरूत्साह जाणवला आहे. ९ लाख महिला मतदारांपैकी अवघ्या ३ लाख ८१ हजार ५७२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या डोंबिवलीतही महिलांच्या मतदानाचा टक्का कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -