घरमहाराष्ट्रमी नाराज नाही

मी नाराज नाही

Subscribe

एकनाथ खडसेंचा यु - टर्न ,पक्षांतराच्या वृत्ताचेही केले खंडन

मी नाराज नाही, असे सांगतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष लक्ष्य केले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी आपण मंत्री असताना औरंगाबाद येथे पशुसंवर्धन विभागाची जागा दिली होती. मंत्रिमंडळातून बाहेर आल्यानंतर स्मारकाच्या विषयाला स्थान मिळाले नाही. पाच वर्षे आपले सरकार असतानाही मुंडे यांचे स्मारक का झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. येत्या १२ डिसेंबर रोजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर स्वाभिमानी मेळाव्याचे आयोजन केले असून त्या मेळाव्याला इतर भाजप नेत्यांसोबत आपणही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांनी मंगळवारी विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अर्धा तास भेट घेतली. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 30 ते 40 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर आयोजित स्वाभिमान मेळाव्याच्या निमित्ताने आपण या निधीची घोषणा करावी, अशी विनंती खडसे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली. मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी निधी देण्याचे आणि औरंगबाद दौर्‍यावेळी नियोजित स्मारकाच्या जागेला भेट देण्याचे आश्वासन दिल्याचे खडसे म्हणाले.

- Advertisement -

भाजपच्या राजकीय निर्णयप्रक्रियेतून डावलले गेलेले एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. सोमवारी त्यांनी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यासंदर्भात विचारले असता खडसे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार माझी मनधरणी करण्यासाठी आले नव्हते. भेटीत आपले सरकार का आले नाही, यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या मतदारसंघातील दोन सिंचन प्रकल्पांना केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीची आवश्यकता आहे. ही शिफारस मिळवून देण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतली. दोन सिंचन प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. केंद्राने निधी देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण शिफारस केली तर सिंचन प्रकल्पांना गती येईल, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचे खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

कोअर समितीच्या बैठकीला खडसे-पंकजा मुंडे गैरहजर
मंगळवारी भाजपच्या कोअर समितीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण नव्हते. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे या बैठकीला आल्याच नाहीत. गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यस्त असल्यामुळे पंकजा मुंडे बैठकीला आल्या नाहीत, असे भाजपकडून सांगण्यात आले. तर एकनाथ खडसेंना बैठकीतचे निमंत्रण नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -