घरमहाराष्ट्रमाझ्या गुगलीवर फडणवीसांची विकेट

माझ्या गुगलीवर फडणवीसांची विकेट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, तर २ दिवसांत सत्ता का गेली-शरद पवार

माझे सासरे सदू शिंदे, देशातील उत्तम गुगली बॉलर होते. मोठमोठ्या लोकांच्या विकेट्स त्यांनी घेतल्या. मी जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मी क्रिकेट खेळलो नसलो तरी गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा हे माहिती होते. माझ्या गुगलीवर फडणवीसांनीच विकेट दिली तर करायचे काय? विकेट तर घेतलीच पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहाटेच्या शपथविधीवरून टोला लगावला.

२०१९ मध्ये भाजप-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवारांसोबत बैठक झाली होती, मात्र २ दिवसांनी पवारांनी निर्णय बदलल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्याला शरद पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केले की, फडणवीसांना भेटलो ही गोष्ट खरी आहे आणि त्यांच्यासोबत चर्चाही झाली, पण मी २ दिवसांनी धोरण बदलले, असे फडणवीस म्हणत असतील तर २ दिवसांनी मी धोरण बदलूनही त्यांनी शपथ का घेतली? त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चोरून शपथ घ्यायची काय गरज होती? या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, असे फडणवीस म्हणत असतील तर २ दिवसांत सत्ता का गेली? याचा अर्थ असा आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो असेच त्यांचे धोरण होते हे दिसून आले.

यावेळी मी फसवले असेल तर ते का फसले? उद्या मी तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला, असे म्हटलो तर तुम्ही याल का, असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. यावेळी पत्रकारांनी अजित पवार हे चेंडू होते का, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस कुठेही जाऊ शकतात, काय करू शकतात हे दिसून आले, बाकी काही नाही, असे उत्तर पवारांनी दिले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काहीही संबंध नव्हता. केवळ आमची भेट झाली होती. आम्ही आजही भेटतो, परंतु यातून फडणवीसांची अस्वस्थता दिसून आली. ती महाराष्ट्रासमोर यायची गरज होती, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -