घरमहाराष्ट्रनाशिकअखेर सुपर ५० विद्यार्थ्यांची शाळा भरली

अखेर सुपर ५० विद्यार्थ्यांची शाळा भरली

Subscribe

विद्यार्थ्यांना सोडून जाताना पालकांना अश्रू अनावर

नाशिक :  होस्टेलमध्ये राहण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री डोक्यावर घेवून तर काहिंनी टू व्हिलरला बॅग बांधत उपाध्ये कॉलेज गाठले. आपल्या गावातील, तालुक्यातील महाविद्यालय सोडून नाशिक शहरालगतच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना या ‘सुपर ५०’ विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात भिती होतीच. शिवाय नवीन महाविद्यालयाविषयी उत्सुकताही होती. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर बघितला आणि आनंद तर झाला, पण आपल्यासोबत आलेल्या आई-वडीलांना ‘बाय-बाय’ करताना अश्रूही अनावर झाले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमास गुरुवारी (दि.२२) प्रारंभ झाला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुधीर पगार, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, गट शिक्षणाधिकारी नीता चौधरी, विस्तार अधिकारी सी. बी. गवळी, समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, केंद्रप्रमुख मोकाशी, उपाध्ये कॉलेजचे संचालक भरत टाकेकर व प्राचार्य संतोष तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पालकही उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ५० विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी सायन्ससोबत जेईई, नीट व सीईटी या प्रवेश परीक्षांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे २१०० विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अखेर गुरुवारी या विद्यार्थ्यांना उपाध्ये कॉलेजमध्ये दाखल होण्याची सूचना करण्यात आली. सकाळी १० वाजेपासून पालक व विद्यार्थी हजर होत गेले. पहिल्या दिवशी ४० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आपल्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींव्यतिरीक्त नवीन मित्र भेटल्याचा आनंद या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. पालकांनीही आनंद झाला. भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २० पेक्षा अधिक मुलींचा समावेश होता. त्यांना नवीन महाविद्यालयाविषयी कमालिची उत्सुकता तर होतीच शिवाय आपल्याला मिळणारे शिक्षण हे आई वडीलांचे स्वप्न साकार करण्याची संधी असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची ‘सुपर ५०’ ही नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यात प्रथमच राबवली जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देत जिल्हा परिषदेने एकप्रकारे त्यांचे पालकत्व स्विकारले आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना आयआयटी, एमआयटी यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, हा या योजनेमागील मूळ हेतू आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदे पहिले पाऊल टाकले आहे.पालकमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी या उपक्रमाची व्याप्ती वाढवत पुढील वर्षापासून १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यातील ५० विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील राहतील.

सुपर 50 या उपक्रमातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, हा यामागील हेतू आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्यास त्यांनाही आयआयटी सारख्या नामांकित संस्थांंमध्ये शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम सुरु झाल्याचा आनंद आहे.– आशिमा मित्तल,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

सुपर 50 या उपक्रमांतर्गत माझी नातीची निवड झाली. तीला कॉलेजमध्ये शिकण्याची इच्छा होती म्हणून येथे सोडण्यासाठी आलो. येथे आल्यानंतर खूप आनंद वाटला की आपली नात या कॉलेजमध्ये शिकणार आहे. तीने असेच शिक्षण घेवून आई-वडीलांचे आणि आमचे नाव मोठे करावे. एवढीच आमची अपेक्षा आहे.
– पार्वताबाई खाडे,आजी

 

आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला कधीही शहरातील मोठ्या कॉलेजमधे प्रवेश घेता आला नसता. पण जिल्हा परिषदेने आम्हाला ही संधी उपलब्ध करुन दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आम्ही मनापासून अभ्यास करणार आहोत. जेईई,नीट, सीईटी या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.
– प्रांजली अहिरे,विद्यार्थ्यांनी

 

सुपर 50 या उपक्रमाविषयी माहिती मिळाली आणि प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेत निवड होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण संधी मिळाली आहे. आता यापुढील जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. आई-वडीलांनी आमच्यासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे.
– वृषाली वाघमारे,विद्यार्थ्यांनी

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -