घरमहाराष्ट्रशरद पवारांचे ऋण फेडण्यासाठी रोहित पवारांना शिरुरमध्ये उमेदवारी द्या

शरद पवारांचे ऋण फेडण्यासाठी रोहित पवारांना शिरुरमध्ये उमेदवारी द्या

Subscribe

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली आहे.

“खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यांवर शरद पवारांचे खुप मोठे उपकार आहेत. १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत या भागातील शेतकरी उभा रहावा, यासाठी धरणांची उभारणी शरद पवार यांनी केली. चारही तालुके आज पाण्याखाली आले असून प्रत्येक शेतकरी सक्षम होत आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी पवार परिवारातील युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या. माझ्यासह प्रत्येक जण मताच्या रूपातून पवारसाहेबांच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय रहाणार नाही”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आज राजगुरुनगर येथील युवक मेळाव्यात व्यक्त केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील चारही तालुक्यात प्यायला देखील पाणी उपलब्ध होत नव्हते. या भागात रोजगार उपलब्ध होत नव्हता. आम्ही सर्वांनी ७२ सालचा दुष्काळ अनुभवला आहे. सुकडी खाऊन आम्ही दिवस काढले. मात्र आता हे चित्र बदलले आहे. हा बदल शरद पवारांमुळे शक्य झाला. प्रत्येक तालुक्यात धरणे बांधली आणि कालव्यातून गावागावांत पाणी नेऊन कोरडवाहू शेती बागायती केली. त्यातून आजचा शेतकरी उभा राहिला आहे. या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चाकण येथील मोठी उद्योगनगरी उभी राहिली. त्यातून आमच्या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. पवारांचे आमच्यावर उपकार आहेत, त्यांच्याबद्दल आदरभाव आहे. त्यामुळे पवारसाहेबांच्या या उपकारांची परतफेड आम्हाला करायची आहे. त्यासाठी रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या साक्षीने माजी आमदार मोहितेंनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -