घरमहाराष्ट्र'एसटी'च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!

‘एसटी’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!

Subscribe

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता वर्षातील ६ महिने मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल.

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षातील सहा महिने मोफत एसटी प्रवास करता येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचारी करत असलेली ही मागणी रावते यांनी मान्य करून कर्मचाऱ्यांना गणपतीमध्ये दिवाळीचा बोनसही दिला आहे. एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या २५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पाससाठी मागणी केली आहे. ज्या ‘एसटी’ची ऐन उमेदीत प्रामाणिक सेवा केली, त्या एसटीतून निवृत्त झाल्यानंतर धार्मिक किंवा अन्य पर्यटनासाठीच्या प्रवासात सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रावते यांच्याकडे केली होती. नोकरीत असताना दररोजच्या धावपळीमध्ये कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष देता न आल्याने, किमान निवृत्तीनंतर तरी कर्मचाऱ्यांना कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालवता यावेत तसंच सपत्नीक धार्मिक किंवा अन्य कारणासाठी पर्यटन करता यावे, यासाठी एसटीकडून ही खास सुविधा देण्यात आली आहे. निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बेताची असल्यामुळे साहाजिकच पर्यटनासाठी त्यांच्याकडे एसटी बसशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच त्यांच्यासाठी ६ महिन्यांचा मोफत प्रवास पास उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


वाचा: एसटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा’ पावला!

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

याआधी पगारवाढीसह अन्य विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले होते. त्याचा फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला होता. त्यामुळे या अघोषित संपावर गेलेल्या सुमारे १ हजार १० कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले तसंच त्यांच्या बदल्यादेखील रोखल्या गेल्या. त्यामुळे एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला होता. त्यापाठोपाठ आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत घेण्यात आलेल्या या महत्वाच्या निर्णायामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -