घरदेश-विदेशमी पुन्हा येईन! 2024 मध्ये पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास

मी पुन्हा येईन! 2024 मध्ये पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास

Subscribe

=लाल किल्ल्यावरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले =२०४७ चे स्वप्न साकारण्याचा सुवर्ण क्षण म्हणजे पुढची ५ वर्षे =मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, तुमच्यासाठीच कष्ट उपसतो आहे =भ्रष्टाचारविरोधातील लढाई सुरूच राहणार

देशात २०१४ मध्ये परिवर्तन घडेल, असे आश्वासन मी तुम्हाला दिले होते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून सर्वोच्चपदी बसवले. २०१९ मध्ये कामगिरीच्या आधारावर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढील ५ वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. जेव्हा देश २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला तिरंगा जगातील विकसित देशाची ओळख म्हणून फडकावा.

यासाठी सर्वात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे पुढची ५ वर्षे आहेत. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन तेव्हा लाल किल्ल्यावरून विकसित भारताचा झेंडा फडकवणार आहे. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे. मी तुमच्यासाठीच कष्ट उपसतो आहे. कारण सगळे भारतीय हे माझे कुटुंब आहेत, मी तुमचे दु:ख सहन करू शकत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सोबतच २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासदेखील व्यक्त केला.

- Advertisement -

सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, युरियाला परवडणारे बनवण्यासाठी देशाचे सरकार युरियावर १० लाख कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. मुद्रा योजनेने तरुणांना त्यांच्या व्यवसायासाठी २० लाख कोटी रुपये दिले आहेत. ८ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायाने १-२ लोकांना रोजगार दिला आहे. वन रँक वन पेन्शन योजना लष्कराच्या वीरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदेशीर ठरत आहे. प्रत्येक श्रेणीत भारताचे नशीब बदलण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा वापरला गेला आहे.

येत्या ५ वर्षांत भारत पहिल्या ३ अर्थव्यवस्थांमध्ये
लाल किल्ल्यावरून मी १० वर्षांचा हिशोब देशवासीयांना देत असल्याचे मोदी म्हणाले. १० वर्षांपूर्वी भारत सरकारकडून ३० लाख कोटी रुपये राज्यांमध्ये जात होते, गेल्या ९ वर्षांत ते १०० लाख कोटींवर पोहोचले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी पूर्वी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये दिले जात होते, आज ते ३ लाख कोटींहून अधिक आहे. गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ४ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. २०१४ मध्ये आम्ही आलो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत आम्ही १० व्या क्रमांकावर होतो. आज १४० कोटी लोकांच्या प्रयत्नांचे फळ मिळाले आहे, आम्ही पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या ५ वर्षांत भारत जगातील पहिल्या ३ अर्थव्यवस्थांमध्ये असेल ही मोदींची गॅरंटी; असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

- Advertisement -

लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा संबोधन
१५ ऑगस्टच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. मंगळवारी सकाळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भाजप सरकारच्या मागील ९ वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडला. त्याचप्रमाणे याआधी देशाला भ्रष्टाचाराच्या राक्षसाने ग्रासले होते, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला बाधित ठरत होते, भ्रष्टाचारविरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचे म्हणत काँग्रेसवर कडाडून टीका केली.

मणिपूरमध्ये शांततेतूनच तोडगा
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचाही उल्लेख केला. मणिपूर आणि हिंदुस्थानच्या इतर भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठीशी आहे. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे, असा पुनरुच्चार मोदींनी केला.

पुढच्या वेळी मीच म्हणणे हा अहंकार-मल्लिकार्जुन खर्गे
पराभव आणि विजय जनतेच्या हातात आहे. २०२३ मध्येच आम्ही २०२४ मध्ये परत येऊ असे म्हणणे म्हणजे अहंकार आहे. स्वातंत्र्य दिनीही त्यांनी विरोधकांबाबत अशी विधाने केली तर देश कसा घडवणार, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आक्षेप घेतला. अटल बिहारी वाजपेयींसह प्रत्येक पंतप्रधानांनी देशाचा विचार केला आणि विकासासाठी आवश्यक पावले उचलली. महान नेते नवा इतिहास घडवण्यासाठी जुना इतिहास पुसत नाहीत.

हे नेते हुकूमशाही करून लोकशाही संपवत आहेत. ज्या कायद्यांद्वारे देशात शांतता प्रस्थापित झाली, आता त्या कायद्यांची नावेही बदलली जात आहेत. लोकशाही, संविधान आणि स्वायत्त संस्था धोक्यात आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर यांच्याकडून केवळ छापे टाकले जात आहेत. निवडणूक आयोगालाही कमकुवत केले जात आहे. विरोधी खासदारांना त्रास दिला जात आहे, निलंबित केले जात आहे, त्यांचे माईक बंद केले जात आहेत, त्यांची भाषणे कापली जात आहेत, असा आरोपही खर्गेंनी केला.

घराणेशाहीचे उच्चाटन देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक
भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण ही आव्हाने आपल्यासमोर आहेत. या गोष्टी आपल्या देशाच्या लोकांमधील आकांक्षा दाबून टाकतात. लोकांचे शोषण करतात. आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष. त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा. घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते. त्यामुळे घराणेशाहीचे उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -