घरमहाराष्ट्रउद्योगपती रतन टाटांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव

उद्योगपती रतन टाटांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव

Subscribe

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेला पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास’, अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, अशी भावना शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुलाबा येथील निवासस्थानी जाऊन टाटा यांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान केला. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.

- Advertisement -

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी टाटा यांच्यासमवेत टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आदींशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

उद्योगमित्र, उद्योगिनी पुरस्कारांचे आज वितरण
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे पुरस्कार आज,रविवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता होणार आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरूप १५ लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरूप ५ लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

टाटा म्हणजेच विश्वास हे नाते
मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे नाते आहे. राज्य सरकारच्या वतीने उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंचीही वाढली.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -