Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश गुप्तकाशी

गुप्तकाशी

Subscribe

चारधाम यात्रेतील हा खडतर प्रवास आम्हा सर्वांच्या.. आयुष्यातील अतिशय संस्मरणीय प्रवास ठरेल.. यात तीळमात्र शंका नाही.. भोलेनाथ महादेवाने आम्हास सुरक्षितरित्या गुप्तकाशीस आणले. सकाळी स्नानादी कर्मे आटोपून आम्ही गुप्तकाशी दर्शनासाठी गेलो. ह्यास गुह्यकाशी असेही म्हणतात. हा केदारनाथला जाण्यासाठीचा महत्वाचा थांबा आहे. मंदिरासमोर मनकर्णिका कुंड आहे. त्यात स्नान करून दर्शनासाठी जातात.

– स्मिता धामणे

ब्रह्मा, विष्णू, महेश, पंचबद्री, पंचकेदार, पंचप्रयाग यांसोबतच अनेक पौराणिक महत्व असलेली मंदिरे, तीर्थस्थळें असणार्‍या या देवभूमीतील आजचा पाचवा दिवस.. पाच जून २०२३. हरसीलहून उत्तरकाशी येथे येण्यास रात्रीचे तीन वाजलेले. दररोजच झोप नि आराम कमी. उशीर होणार असल्याने रात्रीचे आधीच ऑर्डर दिलेले जेवण मिळणार नसल्याने रस्त्यात जेवण केले. ब्रह्ममुहूर्ती थोडा आराम करून सकाळी लवकरच चहा घेऊन निघालो. त्याआधी काही विशिष्ट सोबती आमच्या गाडीतील सर्वांच्या मोठ्या बॅग्ज गाडीच्या कॅरियरवर ठेवण्याचे काम चोख बजावत होते. जास्त दिवसांच्या सहली वेळी प्रत्येकाने आपणहून एखादी जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडली आणि आपल्या वागण्यामुळे कोणासही काहीएक त्रास अगर गाडीस उशीर होणार नाही.. ही काळजी घेतली म्हणजे.. ती सहल सर्वांसाठी एक संस्मरणीय अशी आनंदयात्रा ठरेल.

- Advertisement -

सुंदर निसर्गभूमी बघण्याची प्रबळ इच्छा..दर्शनाची तीव्र आस.. यामुळेच सर्वजण उत्साही -ताजेतवाने दिसत होते. कारण..सर्वांच्या मनी..हृदयी..

बस लिए समर्पण तनु -मन से
हम.. देवभूमी में आते.. हैं..
हम.. धन्य-धन्य हों जाते हैं..
हम.. धन्य-धन्य हों जाते हैं..

- Advertisement -

हीच भावना अखंड वास करत होती.

गणपती बाप्पा मोरया..!
केदारनाथ भगवान की जय !

च्या गजरात प्रवासास सुरुवात झाली. सामूहिक स्तोत्रपठणांमुळे वातावरणात पवित्र स्पंदने निर्माण होत होती. आज २४० कि. मी. चा प्रवास करावयाचा होता. फक्त सहा महिने होणारी यात्रा.. त्यातही उन्हाळी सुट्यांचा कालावधी असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन भरपूर वेळ लागत होता. गंगोत्रीपासून पवित्र भागीरथी सोबतचा प्रवास सुखकर सुरू होता. प्रभातसमयी दाट धुक्यास सोबत करण्यास..सारा.. जलदवृंद खाली उतरलेला. लाल माती.. खोल दर्‍यांमध्ये चेस्टनट, बेरी, चेरी, ऍपल, स्पीनडलवूड, ओक, अंजीर ही झाडे.. तर एकमेकांच्या कुशीत विसावून सुखावलेल्या असंख्य लतावेली.. झुडपे.. काही फुलझाडे.. बर्‍याच ठिकाणी शिशिर फुललेला..

मधेच थोड्या जलधारा बरसून प्रसन्नता वाढवीत होत्या. ह्या सार्‍यांचा पाठशिवणीचा खेळ बघताना सहाजिकच हृदयनाथजींचे स्वर कानी गुंजू लागलें..

नभ उतरू आलं
चिंब थर्थर वल..
अंग झिम्माड झालं
हिरव्या.. बहरांत..

साधारण ८५ कि. मी. आल्यानंतर न्यू टिहरी विचारून रस्ता बरोबर असल्याची खात्री केली जात होती. बाहेरील फलक तेच दर्शवीत होते. माझी उत्सुकता शिगेस पोहोचली. चहापानासाठी थांबलो तेंव्हा दुकानदारास विचारले.. न्यू टिहरी हैं.. तो पुरानी टिहरी कहाँ हैं?? तेंव्हा त्याने थोडी माहिती दिली.

रुद्रप्रयागपर्यंत बायपास असल्यामुळे.. नई टिहरी.. श्रीनगर.. रुद्रप्रयाग.. गुप्तकाशी मार्गे जाण्याचे ठरविलेले. रस्ता वेळोवेळी बरोबर असल्याची खात्री करून घेत होतो. संध्याकाळ होत आलेली.. चांगले जेवण करावयाचे म्हणून ड्राइवरने काही खाल्ले नव्हते. श्रीनगर आल्यावरच खाईन. आधी आपण हा अवघड रस्ता पार करून जाऊयात. आम्ही खूप उंच.. उंच चाललो होतो. अशा दुर्गम रस्त्यांवर निसर्गातील सर्वात उत्कट संगीत म्हणजेच पाऊसधारा दोन.. तीन वेळा भेटतच होत्या. धरित्री नवा.. कोरा.. गर्द हिरवा शालू ल्यायली होती. प्रवास खडतर असला तरी समृद्ध निसर्ग..

हसरा.. नाचरा.. जरासा लाजरा..
सुंदर.. साजिरा.. श्रावण.. आला..

गुणगुणण्यास भाग पाडत होते. गाडीतही सुंदर गाणी आम्ही ऐकत होतो.

आशिया खंडातील २६०५ मी. उंचीवरील सर्वात उंच टिहरी धरणाच्या आजूबाजूने आमची गाडी चाललेली. ४२ चौ. कि. मी. इतक्या विस्तीर्ण क्षेत्राचे जलाशय आम्हास एखाद्या टबप्रमाणे दिसत होते.. इतक्या उंचीवर आम्ही होतो. स्वर्गीय नजारा.. आमच्यासमोर होता. बलाढ्य अशा पर्वतरांगा, नितळ निळे आकाश, आकाशाचे प्रतिबिंब त्या विशाल जलाशयात पडल्याने पाण्याला आलेली निळी झळाळी.. ह्या निसर्गराजास दृष्ट लागू नये म्हणून की काय परमेश्वराने काळे.. सावळे ढग आकाशात पाठविलेले.

ह्या जलाशयाच्या मध्यभागी विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसोबतच Floating Huts, Floating Dinning, Music असे ‘सराई ’ येथे बनविले आहे. Suspension Bridge गाडीतून उतरून पायी चालावा असाच आहे. थोड्या अंतरावर त्याचे रंग बदलत असतात. स्वर्गीय निसर्गाच्या कुशीतील हे सर्व बघणे म्हणजे केवळ.. शब्दांच्या पलीकडलेच. मिनी मालदीव अन.. सिंगापूर उगाच नाही म्हणत ह्याला. लवकरच पुन:श्च भेट देण्याचे मानस पक्के केले.

श्रीनगर केव्हा येतंय ह्याची वाट पहात असतानाच जास्त उंच आणि मोठ्या गाड्या प्रतिबंधित असलेल्या ठिकाणी अडकलो. रात्र असल्याने आम्ही परत न जाता सर्व कॅरीअरवरील बॅग्ज खाली उतरवल्या.. गाडी पुढे नेऊन पुन्हा चढवल्या. त्यात पाऊस सुरू झालेला.. स्थानिक लोक पोलिसात तक्रार करण्याचे सांगत होते. त्यांना विनंती करून वेळ निभावून नेली. येथील पाऊस म्हणजे अत्यंत लहरी. रात्र असल्याने मन घाबरे होऊ लागले. रस्ता शोधत आपण फिरत आहोत. जंगलात चकवा लागावा तसा हा पाऊसही अडकून पडला तर?? त्याला त्याच्या परतीची वाटच सापडली नाही तर??

‘अंधार दाटतो.. पाऊस वाजतो
पाऊस भिजतो.. काळोखात..’

तसंच मन नाना विचारांनी अन.. प्रभू नामस्मरणाने भिजून निघत होतं..

ड्राईव्हर अती थकल्याने डुलक्या खात होते. त्यांना विविध प्रश्न विचारून बोलायला भाग पाडत होतो. आम्हा सर्वांचे प्रभू नामस्मरण सुरू होते. सकाळी नाश्ता म्हणून दिलेले पराठे बरोबर नसल्यामुळे कुणीही खाल्ले नव्हते. जवळ असलेल्या खाद्यपदार्थांवरच चाललेले. आताही जास्त रात्र झाल्यास हॉटेल्स बंद होण्याची भीती. असाच रस्ता विचारीत आम्ही साधारण साडे अकराच्या सुमारास श्रीनगर येथे जेवणास थांबलो. झोप अनावर होत असल्याने ड्रायव्हर झोपी गेला. आपणही आराम करू कोठेतरी.. सकाळी चार वाजता येथून निघू. परंतु ‘मैं बिलकुल ठिक हूँ, गाडी चलाने में कोई दिक्कत नहीं, असे सांगून पुढील प्रवासास ईशनामस्मरणाने सुरुवात केली.

थोडे गेल्यावर नुकतीच जेवणे झाल्यामुळे.. प्रवासाच्या रोजच्या थकव्याने बरेच सोबती निद्रादेवीच्या अधीन केव्हा झाले ते त्यांनाही कळले नाही. ड्राईव्हर महाशयही डुलक्या खात गाडी चालवत होते. पुन्हा.. पुन्हा आम्ही सांगत होतो. गाडी थांबवून तुम्ही झोपून घ्या. तरीही ऐकत नव्हते. २६ जणांचा जीव त्यांच्या हातात होता. शेवटी श्री.धामणे ह्यांनी रस्त्यातील पेट्रोल पंपावर गाडी बाजूला घेऊन त्याला खूप रागावून झोप काढायला लावली. प्रवास करत असताना केंव्हा कोणत्या अडचणी येतील?? काहीच सांगता येत नाही. केदारनाथ.. अतीकठीण चढाई असलेले.. खरं तर थोडा आराम.. झोप मिळायला हवी होती, परंतु आम्हाला फक्त तेथे सुरक्षितपणे कसे पोहोचू ह्याचीच काळजी लागून राहिलेली.

ड्रायव्हरच्या थोड्या झोपेनंतर आम्ही निघालो. सकाळी पाच वाजेच्या सुमारास ‘गुप्तकाशी’ येथे सुखरूप येऊन पोहोचलो. चारधाम यात्रेतील हा खडतर प्रवास आम्हा सर्वांच्या.. आयुष्यातील अतिशय संस्मरणीय प्रवास ठरेल.. यात तीळमात्र शंका नाही.. भोलेनाथ महादेवाने आम्हास सुरक्षितरित्या गुप्तकाशीस आणले. सकाळी स्नानादी कर्मे आटोपून आम्ही गुप्तकाशी दर्शनासाठी गेलो. ह्यास गुह्यकाशी असेही म्हणतात. हा केदारनाथला जाण्यासाठीचा महत्वाचा थांबा आहे. मंदिरासमोर मनकर्णिका कुंड आहे. त्यात स्नान करून दर्शनासाठी जातात. कुंडातून दोन स्वतंत्र धारा वाहतात. गंगा आणि यमुना. भगवान विश्वनाथ आणि अर्धनारीश्वर मंदिर आहे. बंधू.. गुरु ह्यांचा नाश केल्यामुळे महादेव पांडवांना दर्शन देण्यास तयार नव्हते. म्हणून येथे गुप्त झाले.. म्हणून गुप्तकाशी.. दर्शन छान झाल्याने तन.. मन.. प्रसन्न झाले.
जय शंभो भोलेनाथ !

- Advertisment -