घरठाणेLok Sabha 2024 : नरेश म्हस्के यांच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Lok Sabha 2024 : नरेश म्हस्के यांच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Subscribe

ठाणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शुक्रवारी (ता. 03 मे) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्केच विजयी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाणे : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शुक्रवारी (ता. 03 मे) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या प्रचार रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी महायुतीचे नेते उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde believes in victory of Naresh Mhaske)

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प लोकांनी केला आहे. तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे. केवळ ठाण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात कधी नव्हे इतकी विकास कामे केली आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सणांवर बंदी होती. घरात बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाइव्हने सरकार चालत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. अहंकारामुळे राज्य अधोगतीला चालले होते. याविरोधात आपण उठाव केला. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे सरकार आपण स्थापन केले. मागील दोन वर्षात राज्यात प्रचंड काम झाले आहे. हे काम मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

आजची प्रचंड गर्दी पाहता नरेश म्हस्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. नरेश म्हस्के यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे. यंदाची निवडणूक ही विकासाची निवडणूक असून देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे आवश्यक असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नवी टुम काढली आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असा आरोप करत आहेत. मात्र जोवर चंद्र आणि सूर्य आहेत तोवर बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलणार नाही, अशी ग्वाही सुद्धा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

यामिनी जाधव आणि रविंद्र वायकरांचा अर्ज दाखल

मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी महायुतीचे म्हणजेच मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) व अन्य मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

हेही वाचा…Lok Sabha 2024 : राहुल गांधींची चायनीज गॅरंटी, सांगलीतील सभेत अमित शहांचा टोला


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -