घरमहाराष्ट्रलॉकडाऊन कायम, निर्बंध शिथिल होणार

लॉकडाऊन कायम, निर्बंध शिथिल होणार

Subscribe

लॉकडाऊनबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

मुंबईसह राज्याच्या शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे सध्या लागू असलेला लॉकडाऊन कायम ठेवून निर्बंध शिथिल करण्याबाबत गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना नेमके कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत येत्या १ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. निर्बंध शिथिल करताना सध्या दुकानांना दिलेल्या वेळेत आणखी वाढ करायची का, अन्य दुकानांना मुभा द्यायची का यावर येत्या दोन-तीन दिवसात बारकाईने अभ्यास होऊन निर्णय होईल, असेही टोपे यांनी सांगितले. तर ज्या जिल्ह्यात १० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे, अशा जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतो आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरची आकडेवारी एवढी झाली आहे. मात्र, आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे. एकदम लॉकडाऊन न उठवता तो १ जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -