घरमहाराष्ट्रआघाडीतील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्यांची गरज

आघाडीतील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्यांची गरज

Subscribe

चंद्रकांत पाटील यांचा टोला, दूध दरवाढीसाठी भाजप एक ऑगस्टला आंदोलन करणार

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दूध दरवाढीसाठी भाजप एक ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी  दिली. मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सात महिने आयोगाचे ऑफिस बंद आहे, हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना हे ऑफिस बंद असणे चुकीचे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

दूध दरवाढीसाठी  भाजपने 1 ऑगस्टला आंदोलनासाठी तयारी सुरु केली आहे. डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची भाजपची मागणी आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आमचे आंदोलन हिंसक नसेल, अधिकार्‍यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे त्याचे स्वरुप असेल असे पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरावरून चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकर्‍यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहे. दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचं तुम्ही एकदा म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य ऐकायला मिळत नाही. राजू शेट्टी, कधी आंदोलन करणार आहेत. हे आम्हाला पाहायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -