घरमहाराष्ट्रमनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा

मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा

Subscribe

जनतेचे प्रश्न सत्ताधारी आमदार विचारू शकत नाही

मुंबईतील खड्ड्यांना सरकार विहिरी समजते का?
न्यायालय, सरकार संगनमताने काम करते का?
शिवसेनेचा पर्यावरण मंत्री असताना ‘आरे’तील
झाडांची कत्तल का थांबवली नाही?

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माझ्या हाती सत्ता येईल, असे मला वाटत नाही, मला माझा आवाका लक्षात येतो, त्यामुळे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने अशी मागणी केली नाही, अशी मागणी मी या विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे करत आहे, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आज सक्षम, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे आणि आपण या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेला प्रबळ विरोध पक्ष बनवावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मनसेने घेतल्यानंतर राज ठाकरे यांचा प्रचारदौरा बुधवारी पुण्यापासून सुरू झाला, पहिली सभा पुण्यात बुधवारी होणार होती, मात्र मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द झाल्यामुळे गुरुवारी मुंबईत ही पहिला सभा पार पडली. फक्त १५ मिनिटेच केलेल्या आपल्या भाषणात मनसेला विरोधी पक्ष करा, अशी आजपर्यंत देशातील कुठल्याही राजकीय पक्षांनी केली नसेेल, अशी विचित्र मागणी राज ठाकरे यांनी मतदारांना केली.

समाजातील सर्व घटक अस्वस्थ आहेत. दर पाच वर्षाला राजकीय पक्ष नुसत्या घोषणा देतात, तुमच्या तोंडावर जाहीरनामे फेकतात, नंतर जल्लोष करतात. आश्वासने विसरुन जातात. अशा प्रकारे ही सरकारने कशीही वागतात. काहीही कामे करतात. कधीतरी देशातल्या न्यायालयांकडून तुम्हाला न्याय मिळणार आहे का?

- Advertisement -

तुमचा आवाज कोण व्यक्त करणार? रोजच्या राज वाहने वाढत आहेत. अपघात होत आहेत. तुम्ही आहात काय की नाही आहात? तुम्हाला कोण विचारतोय? कधी तरी तुम्ही सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारणार आहात का? मला मुंबईत एखादा तरी समाधानी माणूस दाखवा, उद्योग धंदे बंद पडत आहेत, रोजगार मिळत नाही, उद्योगात एक नंबर असलेल्या महाराष्ट्र राज्याची बिकट अवस्था झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला तुमचे प्रश्न मांडालयलाही परवानगी घ्यावी लागते. अशा वेळी विरोधी पक्षाचा आमदारच तुमच्या मनाची खदखद मांडू शकतो. सरकारला नामोरहम करू शकतो. सत्ताधारी पक्षाचे आमदार काहीही करू शकत नाही. म्हणून मी तुमच्या समोर मनसेला प्रबळ, सक्षम विरोधी पक्ष बनवा, अशी मागणी करत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

मोठ्या प्रमाणात बँक घोटाळे झाले, लोक बँकांच्या बाहेर जाऊन रडत आहेत. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला बँकेतून काढता येत नाहीत. पीएमसी बँकेत अधिकार पदावर भारतीय जनता पक्षाची माणसे आहेत. आता ही बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे त्यांना खातेदारांचा पैसे देता येत नाहीत. शेतकरी, कामगार ओरडत आहेत. तरुणांना नोकर्‍या मिळत नाहीत. उद्योगधंदे बंद पडत आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले. तुम्ही खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत. तुमच्या जाणीवा मेल्या आहेत की काय, बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, जेव्हा तुमच्या जाणीवा मरतात, तेव्हा उरतात ती फक्त जीवंत प्रेतं, असेही ते म्हणाले. पुण्यात अर्धा-पाऊण तास पाऊस पडला आणि सगळा विचका झाला. तिथल्या लोकांना मी सांगितले, यापुढे कुणी विचारले कुठे राहाता? तर पुण्यात सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा. पुणे, ठाणे यांसारखी शहरे अर्ध्या तासाच्या पावसात बुडत आहेत, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.

सरकार रायगड किल्ल्याला ६५० कोटी देणार आहे, असे वाचनात आले, पण इतके पैसे सरकारकडे आहेत का?, देशातल्या बँका बुडत आहेत. रोजगार जातोय. बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. आता कुणी अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाविषयी बोलताना दिसत नाही. किल्ले लग्नसमारंभासाठी देण्याची देखील घोषणा केली. भारतातल्या इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलही आहे आणि इतिहासही आहे. ते लग्नसमारंभांसाठी देण्यासाठी नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले. मला इथल्या न्यायालयांचेही कळत नाही. सरकारशी संगनमत करून कशा प्रकारे काम सुरू आहे हे दिसत आहे. शुक्रवारी झाडे कापायचा निर्णय देता. शनिवार-रविवार सुट्ट्या असतात. या दोन दिवसांमध्ये सगळी झाडे छाटून टाकली. सरकारला याचा जाब विचारायला कुणी धजावत नाही, म्हणून हे असे घडत आहे. याआधीच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्री कुणाचा होता? रामदास कदम हे शिवसेनेचे पर्यावरणमंत्री होते. ते ही झाडांची कत्तल थांबवू शकले नाहीत का? आणि आता शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगतात, सरकार हाती दिल्यावर आरेला जंगल घोषित करू.

आम्हाला मूर्ख समजलात का? , असेही राज ठाकरे म्हणाले. मध्यंतरी हे म्हणत होते की सव्वा लाख विहिरी बांधल्या. जर मुंबईतल्या खड्ड्यांना हे विहिरी म्हणत असतील, तर त्याला माझी काही हरकत नाही, असेही ते म्हणाले. जे इकडे-तिकडे जात आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील माहिती नसेल, आज आपण कोणत्या पक्षात आहोत. सगळ्यांच्या घरी सगळ्या पक्षांचे झेंडेच आणून ठेवले असतील. आज ज्या पक्षात साहेब जातील, त्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरायचे, अशा शब्दांत पक्षांतरांवर ठाकरे यांनी टिपण्णी केली. मला ईडीने चौकशीला बोलावले. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडल्यावर पहिले वाक्य सांगितले ‘माझं थोबाड थांबणार नाही.’ ज्याच्यात काही संबंधच नाही, तिथे निवडणुकांचे राजकारण करण्यासाठी चौकशा लावता. ज्यांना अशा धमक्या दिल्या, ते भाजपत गेले. मला, या अशा चौकशांचा काही फरक पडत नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -