घरमहाराष्ट्रराज्य सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या, कोणत्याच पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही - फडणवीस

राज्य सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या, कोणत्याच पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही – फडणवीस

Subscribe

पूरग्रस्तांच्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. राज्य सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या असून कोणत्याच पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही, असं फडणवीस म्हणाले. गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार माजवला असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

राज्यात आतापर्यंत आलेल्या आपत्तींमध्ये केलेल्या घोषणांपैकी एकही मदत जनतेपर्यंत पोहोचली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “सगळ्या घोषणा हवेत विरल्या. कुठल्याच घोषणेची पुर्तता झालेली नाही. ज्या काही आपत्ती आल्या, या आपत्तीमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. त्या काही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत आणि ही वास्तविकता आहे. आम्ही हे वारंवार सांगितलं. कोकणात आलेली आपत्ती असो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातली असो किंवा उत्तर महाराष्ट्रातली असो…त्यावेळी सांगण्यात आलं की आमच्या सरकार प्रमाणे अध्यादेश काढला आहे. पण ती देखील घोषणा हवेत विरली आहे,” असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मराठवाड्यात पंचनामे सुरु करण्याआधी मदतीची गरज

पूरग्रस्त मराठवाड्यात पंचनामे सुरु करण्याआधी तातडीनं मदत करण्याची गरज आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. “ज्यावेळी अशाप्रकारची परिस्थिती असते त्यावेळी नजर आणेवारीच्या आधारावर आपल्याला मदत करता येते. वैयक्तिकरित्या पंचनामे करण्याची आवश्यकता पडत नाही. पंचनामे होत राहतील पण पहिल्यांदा तातडीने काय मदत करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. मंत्री किंवा राज्यातील प्रमुख लोकं त्या ठिकाणी गेले की एक प्रकारे प्रशासन जागं होत असतं. लोकांना काहीना काही दिलासा मिळत असतो. अशा परिस्थितीत कोणी तरी आपलं ऐकतंय असं लोकांना वाटलं पाहिजे ते महत्त्वाचं असतं,” असं फडणवीस म्हणाले.

उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

उद्यापासून देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील असणार आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. तिथली परिस्थिती सरकारपर्यंत पोहचवून आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार, असं फडणवीस यांनी सांगितलं.

- Advertisement -

सागरी आराखड्याला मंजुरी मिळाल्याने आनंद

सागरी आराखड्याला मंजुरी मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. हा संपूर्ण आराखडा आम्ही मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवला होता. गेले काही दिवस मी पाठपुरावा घेत होतो. स्वत: केंद्रीय पर्यावरण भूपेंद्र यादव यांनी मुंबईला बैठक घेतल होती. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना चालना मिळणार आहे. विशेषत: सिडकोच्या क्षेत्रामध्ये रखडलेली कामे सुरु होतील, असं फडणवीस म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -