घरमहाराष्ट्रपक्ष निर्णयानेच पटोलेंचा राजीनामा

पक्ष निर्णयानेच पटोलेंचा राजीनामा

Subscribe

‘सामना’च्या अग्रलेखावर काँग्रेसचा खुलासा, मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतरे व्यक्त करणे अयोग्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर दैनिक ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसारच घेतला होता, असा खुलासा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी केला. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असा सल्लाही लोंढे यांनी दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या शुक्रवारच्या अग्रलेखात पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टळले असते. पक्षांतर करणार्‍यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे आणि त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरू झाली या आरोपात काहीही अर्थ नाही.

जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ला राजकारणात काहीच अर्थ नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आले असे म्हणणेही योग्य नाही. त्याला इतरही काही कारणे असू शकतात. काँग्रेसने काय निर्णय घ्यावेत हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला, असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे आणि त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरून नाही, असेही लोंढे म्हणाले.

- Advertisement -
थोरात-पटोले वादाची काँग्रेसश्रेष्ठींकडून दखल – महाराष्ट्र प्रभारी पाटील रविवारी मुंबई भेटीवर

प्रदेश काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले यांच्यातील वादाची काँग्रेसश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून पक्षातील वाद मिटविण्याची जबाबदारी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पाटील हे येत्या रविवारी मुंबई दौर्‍यावर येत असून ते थोरात तसेच पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून थोरात आणि पटोले यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेले नाट्य, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत दिलेला पदाचा राजीनामा आणि पक्षात पटोलेंच्या विरोधात असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर पाटील यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पाटील हे पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे समजते.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमधील तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले. थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात असून परस्पर निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप थोरात यांनी पत्रात केल्याचे समजते. या पत्रानंतर थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाला सादर करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर एच. के. पाटील १२ फेब्रुवारी रोजी हुबळीहून दुपारी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता ते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. थोरात यांच्या भेटीनंतर सायंकाळी ६ वाजता ते महाराष्ट्र काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. पाटील हे दुसर्‍या दिवशी आपला दौरा आटोपून पुन्हा कर्नाटकला रवाना होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -