घरक्राइमगंगापूर शिवारातील २५ गुंठे जागेचे बनावट दस्त; दुय्यम निबंधकासह ९ जणांवर गुन्हा...

गंगापूर शिवारातील २५ गुंठे जागेचे बनावट दस्त; दुय्यम निबंधकासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Subscribe

नाशिक : वडाळा येथील बनावट दस्ताऐवजाचे प्रकरण ताजे असतानाच दुय्यम निबंधक विजय राजुळे यांचा खोटेपणा नुकताच उघडकीस आला आहे. गंगापूर शिवारातील प्लॉट मिळकतीचे बनावट दस्त तयार करून ३ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निबंधक विजय राजुळेंसह अन्य ९ व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

याप्रकरणी अ‍ॅड. सहाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक महापालिका हद्दीतील गंगापूर शिवारातील मिळकत सर्व्हे क्र.५८ चा हिस्सा क्र.४ मधील प्लॉट क्र.६, २४, ४०, ४४, ४८, ५०, ५१ व ५२ च्या संदर्भात योगेश सुभाष तारगे, संतोष चंद्रकांत घोडके, गीता सदाशिव कदम, सोनाली झोंबाड, किशोर नथमल भुतडा, शरद बाजीराव पवार, रवींद्र बाजीराव पवार, कृष्णा दत्तू ढगे, पंडितराव गोरले यांचा अ‍ॅड. सहाणे यांच्यासोबत खरेदीचा व्यवहार ठरला होता. त्या व्यवहारापोटी वरील प्रत्येकाला अ‍ॅड. सहाणे यांनी ३ लाख २४ हजार रुपये व्यवहारापोटी दिले होते.

- Advertisement -

या प्लॉटचे खरेदीखताचे मूळ दस्त १९७७ मध्ये नोंदविण्यात आले होते. परंतु, सातबारा सदरी वरील व्यक्तींची नावे दाखल झाली नव्हती. म्हणून याप्रकरणी नावे दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात दस्त क्र. ३६१/१९७७, दस्त क्र.३६३/१९७७, दस्त क्र. ३६४/१९७७, दस्त क्र.३६६/१९७७, दस्त क्र.३६८/१९७७, दस्त क्र. २७२७/१९७७ नावे लावण्यासाठी दाखल केली असता सदर दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात पडताळून बघितले असता मूळ दस्त वेगळेच असल्याचे लक्षात आले. सदर व्यवहारात फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. सहाणे यांनी सखोल चौकशी केली असता दुय्यम निबंधक विजय राजुळे यांनी सहकार्‍यांच्या मदतीने सर्व प्लॉटचे बनावट दस्त तयार केल्याची धक्कादायक बाब अ‍ॅड. सहाणे यांच्या लक्षात आली.

या दस्तांसाठी सरकारी सही व शिक्के, सरकारी भरणा पावती ईत्यादींचा गैरवापर करण्यात आला असून, बनावट दस्त खरे असल्याचे भासविण्यासाठी विजय राजुळे यांनी दस्तावर स्वाक्षरी केली आहे. हा गंभीर प्रकार असून, यातून महाराष्ट्र शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. बनावट दस्त तयार करून फसवणूक करणार्‍या टोळीत विजय राजुळे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करून या गंभीर प्रकरणी विजय राजुळेंसह वरील ९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची अद्याप कुठलीही माहिती नाही. या प्लॉटसंदर्भातील अभिलेख तपासल्यानंतर अधिक सांगता येईल. : विजय राजुळे, दुय्यम निबंधक, नाशिक

नाशिक शहर व जिल्ह्यात लोकांच्या जमिनीचे बोगस कागदपत्रे व बनावट खरेदीखत तयार करून त्या जमिनीची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. यामध्ये दुय्यम निबंधक व त्यांचे कार्यालय सहभागी असल्याचे पुरावे सरकारवाडा पोलिसांना दिले आहेत. : अ‍ॅड. शिवाजी सहाणे, माजी नगरसेवक, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -