घरमहाराष्ट्रनाशिकअखेर ठरलं, नाशिक जिल्हयात १५ जुलैला होणार ‘शासन आपल्या दारी’

अखेर ठरलं, नाशिक जिल्हयात १५ जुलैला होणार ‘शासन आपल्या दारी’

Subscribe

डोंगरे वसतीगृह मैदान, तपोवर, संभाजी स्टेडियम जागेची पालकमंत्री भुसेंकडून पाहणी

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला शासन आपल्या दारीचा नाशिक जिल्ह्यातील रदद करण्यात आलेला कार्यक्रम आता १५ जुलै रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे समजते. यादृष्टीने प्रशासकीय तयारीने पुन्हा वेग घेतला असून पालकमंत्री दादा भुसे यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरातील डोंगरे वसतीगृह मैदान, तपोवन आणि संभाजी स्टेडियमची पाहणी करत आढावा घेतला.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासन मार्गदर्शनानुसार राज्यभरात एकाचवेळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये 8 जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवनातील मोदी मैदानावर कार्यक्रम आयोजनाची प्रशासनाने तयारी सुरू केली होती. शिवाय या कार्यक्रमात लाभार्थीना योजनांचे प्रमाणपत्र वितरणासह तेथे शासकीय विभागांचे माहितीपर विविध 25 स्टॉल्स उभारण्यात येणार होते, मात्र अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील राजकीय घडामोडी आणि गडचिरोली येथे ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नाशिकमधील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. मात्र आता १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार असल्याची खात्रीलायक माहिती असून पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी शहरात दाखल होत त्याअनुषंगाने तीन ठिकाणांची पाहणी केली. शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान, तपोवन येथील मैदान तसेच नवीन नाशिकमधील संभाजी स्टेडीयमची पाहणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 15 तालुक्यांमध्ये एकूण 70 शिबिरे घेण्यात आली.

2 लाख 44 हजार नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमाचाच भाग असलेला मुख्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत असून, त्यास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारीला सुरूवात केली असून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकार्‍यांची बैठक घेत तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला. या पाहणी दौर्‍यात जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, निवासीउपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -