घरमहाराष्ट्रनाशिकवृद्धांसाठी महापालिकेची व्हॉटस-अ‍ॅप तक्रार निवारण सेवा; महापालिकेचे उंबरे झिजवण्याचा त्रास होणार कमी?

वृद्धांसाठी महापालिकेची व्हॉटस-अ‍ॅप तक्रार निवारण सेवा; महापालिकेचे उंबरे झिजवण्याचा त्रास होणार कमी?

Subscribe

प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांचा प्रकल्प

नाशिक : ‘सरकारी काम आणि बारा महीने थांब’ अशी म्हण भारतात प्रचलित आहे. त्याला कारणही तसेच आहे, लाल फितीत सापडलेले काम करून घेण्यासाठी अक्षरशः पायातील चपला घासून जातात. त्यामागे सर्वस्वी प्रशासनच जबाबदार आहे असे नक्कीच नाही. परंतु, नियम अटी, कार्य पद्धती, यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे अपुरे मनुष्यबळ हेही त्यामागील मोठे कारण आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत वयोवृद्ध नागरिकांचे सगळ्यात जास्त हाल होतात. यावरच उपाय म्हणून नाशिक महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायात यांनी नवा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातून वृद्ध व्यक्तींचे महापालिकेतील हेलपाटे कमी होणार आहेत.

वयोवृद्ध नागरिकांना नाशिक महापालिकेच्या कामकाजाशी संबंधित तक्रार करायची असल्यास प्रत्यक्षात महापालिका मुख्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. दररोज असे असंख्य वयोवृद्ध महापालिकेत तक्रारी घेऊन येत असल्याचे दिसते. या वयोवृद्धांच्या सोयीसाठी आता व्हॉटस अ‍ॅपवर तक्रार करण्याची कार्यप्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी दिली. शहरातील वृत्तपत्रांच्या संपादकांशी बानायत यांनी अनौपचारिक चर्चा केली, यावेळी त्या बोलत होत्या.

- Advertisement -

नागरी कामांच्या तक्रारी करण्यासाठी महापालिकेचे ई कनेक्ट अ‍ॅप कार्यरत आहे. या अ‍ॅपमध्ये आलेली शिथीलता दूर करण्याबरोबरच वयोवृद्ध नागरिकांना तक्रारी करता याव्यात म्हणून स्वतंत्र व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. यात व्हॉटस अ‍ॅपवरही संबंधितांना तक्रार करता येणार आहे. आज ई कनेक्ट अ‍ॅपचा वापर करता येत नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिक महापालिकेचे उंबरे झिजवताना दिसतात. काही दिवसांपूर्वी खासगी जागेतील अतिक्रमणासंदर्भात एक वयोवृद्ध अनेक दिवस महापालिकेत तक्रार घेऊन येत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अशा नागरिकांना सोयीचे होईल अशी तक्रार निवारण व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले. त्यानुसार आता व्हॉटस अ‍ॅपवर तक्रारी करण्याची सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे बानायत यांनी सांगितले. अनेक वृद्ध व्हॉटस अ‍ॅपचा वापर करता. जे करत नाहीत, त्यांचे जवळपासचे लोक व्हॉटस अ‍ॅप वापरतात. या जवळपासच्या लोकांच्या माध्यमातून वृद्धांनी तक्रारी केल्यास त्यांना मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -