घरक्राइमधक्कादायक! मृत व्यक्तीला जिवंत दाखवत हडप केला भूखंड; दुय्यम निबंधक संशयाच्या भोवर्‍यात,...

धक्कादायक! मृत व्यक्तीला जिवंत दाखवत हडप केला भूखंड; दुय्यम निबंधक संशयाच्या भोवर्‍यात, गुन्हा दाखल

Subscribe

नाशिक : महसूल अधिकारी आरडीएक्स असून, ते जिवंत मानवी बॉम्ब असल्याचा थेट आरोप तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केला होता. याचाच प्रत्यय वडाळा गावात झालेल्या एका भूखंड प्रकरणात आला आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट व्यक्ती उभ्या करून नोंदविलेल्या खरेदीखताच्या दस्तामुळे जमीन मालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दस्त नोंदणीत निष्काळजीपणा करणार्‍या दुय्यम निबंधकाविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने बनावट दस्त नोंदविणार्‍या दुय्यम निबंधकांचे धाडस वाढले आहे.

11 वर्षांपूर्वी चंद्रकांत गोरे या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्या मालकीचा वडाळा गावात भूखंड आहे. हा भूखंड वसीम जावेद खान, मुदत्सर जाकीर सय्यद, इरफान सिरोजउद्दीन सय्यद, मोहम्मद अस्लम वारसी या वडाळा गावात राहणार्‍या भामट्यांनी 2021 सालात दुय्यम निबंधकांना हाताशी धरत स्वतःच्या नावावर करुन घेतला. त्यासाठी संशयितांनी बनावट व्यक्ती उभ्या करत मुखत्यार पत्र व खरेदीखत नोंदवली होती. हा प्रकार चंद्रकांत गोरे यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

या प्रकरणातील मुखत्यारपत्राचा एक दस्त (क्रमांक 1761/2021) हा सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तर, दुसरा दस्त (क्रमांक 570/2021) कळवण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला. यावेळी सिन्नर येथे सुधाकर मोरे तर, कळवण येथे योगेश खैरनार हे दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होते. या दोन्ही मुखत्यारपत्रांच्या आधारे 2 जुलै 2021 रोजी दस्त (क्रमांक 6248/2021) दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-7 मध्ये नोंदविण्यात आले. यावेळी राजू शिंदे हे दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होते. अंबड पोलिसांनी ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांनी सिन्नर व कळवण येथे जाऊन मृत व्यक्ती ही जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावे बनावट मुख्यत्यारपत्र नोंदवले.

हा सर्वच प्रकार संशयास्पद असतानाही दुय्यम निबंधकांनी बिनदिक्कतपणे कोणतीही शहानिशा न करता दस्त नोंदवून दिल्याचे सांगितले जाते आहे. वडाळा येथील प्रकरणात दुय्यम निबंधकांनी या परिपत्रकाच्या आधारे दस्त नोंदणी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. संबंधित दस्त नोंदविण्यासाठी आले असताना त्यांची ओळखपत्र तपासून ओळख देणार्‍या व्यक्तीचा खरेपणा तपासून दस्त नोंदविल्याचा दावा तिघा दुय्यम निबंधकांनी केला असला तरीही अंबड पोलिसांनी
या प्रकरणात गुन्हा दाखल करून दुय्यम निबंधकांच्या या सावध भूमिकेचा बुरखा फाडला आहे. त्यामुळे दस्त बनविणार्‍या भामट्यांसोबत दुय्यम निबंधकांवरदेखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून, यात शासकीय अधिकारीच शासनाची कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत आहेत. दुय्यम निबंधकांना हाताशी धरून बनावट दस्त बनविणारे रॅकेट सध्या नाशिक जिल्ह्यात कार्यरत असून, बनावट दस्त तयार करून राजरोसपणे त्या भूखंडांची विक्री करण्याचे उद्योग सुरु आहेत. पोलीस यंत्रणादेखील दिवाणी स्वरुपाचे प्रकरण असल्याचे दर्शवून प्रकरण निकाली काढत आहेत. त्यातून भूमाफियांचे धाडस वाढले आहे.

नोंदणी परिपत्रकाचा असा आहे नियम

दस्त नोंदविणे प्रक्रियेत बनावट आणि तोतया व्यक्तींचा वापर होऊ नये, यासाठी तसेच, खर्‍या जमीनमालकांची फसवणूक टळावी, या उद्देशाने नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 34 व अनुषंगिक तरतुदींनुसार दुय्यम निबंधकांवर सोपविण्यात आलेल्या कर्तव्याच्या अनुषंगाने तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना नोंदणीसाठी आलेल्या दस्ताऐवजामधील पक्षकारांचा खरे पणा पडताळण्यासाठी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रका नुसार दुय्यम निबंधकांनी तथाकथित दस्तातील कबुली जबाब देणार्‍या व्यक्तींकडे चौकशी करून खातरजमा करून घ्यावी. संबंधित पक्षकाराणे मागील 10 वर्षात दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणताही दस्त नोंदणी केला असेल तर त्याचा तपशील नमूद करते अनिवार्य राहील. आय- सरिता कार्यप्रणाली मध्ये नोंदविलेल्या कोणत्याही दस्तावेजाची स्कॅन केलेली प्रत दस्ताचा गोषवारा (फोटो सहित) संबंधित दुय्यम निबंधकांना केव्हाही ऑनलाइन पाहता येईल यातून पक्षकरांच्या खरेपणाची पडताळणी करावी असे परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे.

मोबदलाही लाटण्याचा प्रयत्न 

वडाळा शिवारातील सर्व्हे नं. ८५/१ अ/१/१/२ हा शेती प्लॉट पदमाकर बर्डे, शिवाजी भोजणे, अण्णासाहेब थोरात, सतिष थोरात, रामदास पाटील आणि मृत चंद्रकांत गोरे यांनी सन १९९६ साली खरेदी केला. या प्लॉटवर महादेव हौसिंग सोसायटी स्थापन करुन लेआऊट पाडला. यात एकूण २७ प्लॉट तयार करण्यात आले. प्लॉट नं. २७ हा डीपी रोडसाठी सोडण्यात आलेला होता. हा प्लॉट तब्बल ९०० चौरस मिटर इतका मोठा असून त्याचे बाजार मूल्य तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे. परंतु, हा प्लॉट मनपाकडे हस्तांतरीत झाला नव्हता. याचाच फायदा घेत भूमाफियांनी दुय्यम निबंधकांना हाताशी धरुन खोटी माणसे उभी करत बोगस दस्त नोंदवून घेतले. यातून महापालिकेकडून मिळणार मोबदला देखिल लाटण्याचा या भूमाफियांचा प्रयत्न होता. दस्त नोंदविण्यासाठी संबंधित दुय्यम निबंधकांना मोठी रक्कम दिल्याचे भुमाफियांनी आपल्या जबाबात म्हटल्याचे समजते. याप्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे कळवण येथे नोंदविण्यात आलेले मुखत्यापत्राचे दस्त नाशिकमध्ये नोंदविताना पुन्हा बनावट व्यक्ती उभी करुन नोंदविण्यात आले. हा सर्व प्रकार फसवणुकीचा असताना देखिल दुय्यम निबंधकाने सदरचे खरेदी खताचे दस्त नोंदवून दिल्याने दुय्यम निबंधक देखिल संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधकांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

या प्रकरणी दस्त नोंदणी करणार यांनी दस्ताबाबत सत्यता पडताळून बघायची आहे.दस्त नोंदविणारयांची ओळखपत्रे दस्ताला लावलेली आहेत त्यामुळे ते दस्त कायदेशीर आहे. : राजू शिंदे, तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक, नाशिक ७

वडाळा येथील प्लॉट संदर्भात बनावट दस्त बनवून फसवणूक करणार्‍यात आली आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. : संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक

या प्रकरणात दस्त नोंदणी करणार्‍यांची ओळखपत्रे तपासली आहेत. तसेच ओळख देणार्‍यांची सुध्दा खातरजमा केली आहे. त्यामुळे दस्त कायदेशीर आहे. : सुधाकर मोरे, तत्कालीन दुय्यम निबंधक, सिन्नर

या प्रकरणात पोलिसांनी आमचे देखील जाबजबाब घेतले आहे. आम्ही आमचे म्हणणे मांडले असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे अधिक बोलू शकत नाही. : योगेश खैरनार, तत्कालीन दुय्यम निबंधक, कळवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -