घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील उबेर डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दोन दिवसांनंतर अखेर मागे

नाशिकमधील उबेर डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दोन दिवसांनंतर अखेर मागे

Subscribe

दोन दिवसांपासून सेवा होती ठप्प, विविध मागण्यांसाठी गंगापूररोडसह सातपूरला निदर्शने केल्यानंतर निघाला तोडगा

उबेर फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी करणाऱ्या सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. वाटाघाटीनंतर गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अखेर हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्याने सेवा पूर्ववत झाली.

घरबसल्या विविध पदार्थांची लज्जत चाखायची संधी देत अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरलेल्या उबेर फूड डिलिव्हरी कंपनी आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांच्यात दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे शहरातील हॉटेल विक्रेते आणि खुद्द उबेरलाही याचा आर्थिक फटका सहन करावा लागला. उबेरच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दर तासाला ६० रुपये दिले जात होते, मात्र हीच रक्कम ३५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. त्यातच कंपनीने डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्याने यापूर्वी काम करणाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या ऑर्डर्सचे प्रमाणही कमी झाले आहे. कंपनीच्या अशा भूमिकेमुळे हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
कंपनीने परताव्याबाबतचे धोरण पूर्ववत करावे, या मागणीसाठी डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) सुमारे दोन हजार कर्मचार्‍यांनी संघटित होत निदर्शने केली. सातपूरच्या जिजामाता शाळेच्या प्रांगणात उबेरचे कर्मचारी सकाळपासून संघटित झाले होते. त्यांच्या विविध मागण्या मांडत न्याय मिळण्याची मागणीही त्यांनी केली. याचबरोबर गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान परिसरातही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, गुरुवारी डिलिव्हरी कर्मचारी आणि उबेर कंपनीचे प्रतिनिधी यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर काही वाटाघाटी झाल्या व सकाळपासूनच सेवा पूर्ववत झाली.

- Advertisement -

अन्य कंपन्यांची चांदी

उबेर फूड्सची सेवा ठप्प झाल्याने स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांची मात्र चांगलीच चांदी झाली. मात्र, केवळ उबेरवर नोंदणी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

भागीदारांसाठी आम्ही कटिबद्ध

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उबेर कंपनीनेही आपली भूमिका मांडत बुधवारीच सेवा सुरळीत होणार असल्याचे संकेत दिले होते. काही व्‍यक्‍तींच्‍या समुहामुळे डिलिव्‍हरी भागीदार व आमच्‍या ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करत तोडगा काढण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला होता. डिलिव्‍हरी भागीदारांना उबर इट्स व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून निश्चितच स्थिर व दर्जेदार उत्‍पन्‍न प्राप्‍त होईल, असेही उबेरने स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -