घरमहाराष्ट्रमला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले

मला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले

Subscribe

तुरुंगाबाहेर पडताच अनिल देशमुखांचा आरोप, तब्बल १४ महिन्यांनंतर झाली सुटका

कथित १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणि केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. देशमुख यांची तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी सुटका झाली आहे. देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती वाढवण्याची सीबीआयने केलेली मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली होती. त्यामुळे देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना मला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले. माझ्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयानेच नोंदवले आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकार्‍यांना मिळाल्यानंतर कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता केल्यानंतर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. बाहेर येताच तुरुंगाबाहेर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि देशमुखांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच नेत्यांनी देशमुख यांच्या गळ्यात हार घालत त्यांना पेढे भरवत त्यांचे अभिनंदन केले. कारमध्ये बसल्यावर अनिल देशमुख यांनी भारतीय संविधानाचे पुस्तक उंचावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेला माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात करीत अनिल देशमुख यांना अटक केली होती. देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करणे आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा खोटा आरोप केला, मात्र न्यायमूर्ती चांदिवाल आयोगापुढे साक्ष देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माझ्यावरील आरोप ऐकीव माहितीवर केले असून या आरोपांबाबत त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही, असे त्यांनी सांगितले. सचिन वाझे परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय होता. वाझेवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तीन वेळा निलंबन झाले आहे. एकदा वाझेला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मुंबईतील एका उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वाझेला अटक झाली आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

चर्चा अजित पवारांच्या सरकारी विमान प्रवासाची

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पडताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या घोळक्यात त्यांचे पेढे भरवून स्वागत केले. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेश सुरू असल्याने देशमुख यांच्या मुंबईतील स्वागताला हजर राहण्यासाठी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील दोघेही सरकारी विमानाने मुंबईत पोहचले आणि हे विमान त्यांना चक्क शिंदे-फडणवीस सरकारने उपलब्ध करून दिले. त्यामुळे दिवसभर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीकीची चर्चा होत होती.

यासंदर्भात खुलासा करताना अजित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी मला आणि वळसे-पाटील यांना नागपूरमध्ये होणार्‍या व्यापार सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत सहभागी होण्याची सूचना केली होती, परंतु मला देशमुखांना भेटण्यासाठी मुंबईला जायचे होते. सर्व विमानांची तिकिटे आरक्षित होती. मी विधानसभेतील विरोधी पक्षनेता असल्याने मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. त्यामुळेच मला सरकारने विमान उपलब्ध करून दिले. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईला जाऊन अजित पवार सायंकाळी पुन्हा नागपूरमध्ये परतले.

त्यावर प्रतिक्रिया देताना सरकार आणि विरोधकांमध्ये परस्पर आदर असला पाहिजे याचे हे उत्तम उदाहरण आहे. आमच्या वेळेला मविआ सरकारने आम्हाला विमान उपलब्ध करून दिले नव्हते, पण आम्ही विरोधी बाकांवरील नेत्यांना बंगलेही उपलब्ध करून दिले आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

सत्तेचा गैरवापर झाल्याचे उत्तम उदाहरण

सत्तेचा गैरवापर कसा होतो याचे उत्तम उदाहरण अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकार्‍यांच्या अटकेमधून समोर आले. न्यायालयाचा निकाल राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देणारा असेल तर विचार करायला आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण नसताना सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवले. समाधानाची गोष्ट ही आहे की शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला, पण ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करावा. ज्या यंत्रणेने हे निर्णय घेतले त्या यंत्रणेसंबंधी अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील सहकार्‍यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. आमच्या सहकार्‍यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या इतरांना ती स्थिती येऊ नये हा आमचा प्रयत्न आहे.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -