घरमहाराष्ट्रकोट्यधीश ठाकरे

कोट्यधीश ठाकरे

Subscribe

आदित्य ठाकरेंनी वरळीतून गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला,शिवसेनेने केले शक्तिप्रदर्शन

मोठा गाजावाजा करत आपल्या उमेदवारीची घोषणा करणारे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तितक्याच धुमधडाक्यात वाजतगाजत आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजता दाखल केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्यची आई रश्मी ठाकरे, विद्यमान आमदार सुनील शिंदे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आदित्य यांनी उमेदवारी अर्ज वरळीच्या मतदारसंघातून दाखल केला. अदित्य यांच्या या अर्जासोबत त्यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात स्वत:च्या नावे ११ कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. पक्षप्रमुख उध्दव यांची संपत्ती मात्र १ कोटी ६४ लाख इतकीच असल्याचे म्हटले आहे. बँकेमध्ये 10 कोटी 36 लाख रुपये आहेत. आदित्य यांच्या नावे असलेल्या रोख्यांची किंमत २० लाख इतकी दाखविण्यात आली आहे. आदित्य यांच्या उमेदवारीविरोधात अर्ज दाखल न करण्यार्‍या राजकीय पक्षांचे उध्दव यांनी आभार मानले आहेत.

ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीला उभी राहण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयानंतर आदित्य यांच्यासाठी वरळीचा सुरक्षित मतदारसंघ खाली करून देण्याची तयारी वरळीतील शिवसैनिकांनी केली होती. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यापासून उमेदवारी भरण्यासाठी स्थानिक सैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. काल उमेदवारी अर्ज भरताना या तयारीची झलक पाहायला मिळाली. जोरदार शक्तीप्रदर्शन करताना ढोल ताशांचा गजर करत आदित्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

- Advertisement -

अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. वरळीच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाची री ओढताना आदित्य यांनी, ‘मी केवळ वरळीचा प्रतिनिधी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन’, असं आदित्य यांनी स्पष्ट केले. मी जिंकणार असा मला विश्वास आहे, कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, असे अर्ज भरल्यानंतर आदित्य यांनी सांगितले. आदित्य यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी सुरू केलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून काही राजकीय पक्षांनी या मतदारसंघात उमेदवार न देण्याच्या निर्णय घेतला. विशेषत: मनसेने घेतलेल्या निर्णयाचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वागत करताना आभारही मानले.

कोट्यधीश आदित्य
आदित्य यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद मालमत्तेबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आदित्य हे चक्क कोट्यधीश असून त्यांची संपत्ती उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. आदित्य यांच्या नावे ११ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता नोंदवली गेली असताना वडील आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची मालमत्ता केवळ १ कोटी ६४ लाखांची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आदित्य यांच्या नावे बँकेत १० कोटी ३६ लाखांची रक्कम एफडीच्या रुपात गुंतवण्यात आली आहे. तर २० लाख रुपयांचे रोखे आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्यात आले आहेत. ६४ लाख ६५ हजार रुपयांचे सोने आदित्यच्या नावे खरेदी करण्यात आले आहे.

- Advertisement -

हाती असलेल्या रोकडमध्ये आदित्यकडे केवळ १३ हजार ३४४ रुपये असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. बिलावळे या खालापूरच्या गावात खरेदी करण्यात आलेल्या ६९ एकर जमिनीसाठी आदित्य ठाकरेंना केवळ ७७ लाख मोजावे लागले, असे प्रतिज्ञापत्र दर्शवते. घोडबंदर येथे आशर मिलेनियातील १५०८ चौरस फुट आणि कल्याणमधील ठाकुर्लीच्या श्रीजी आर्केडमधील १२५० चौरस फुट इतक्या दुकानाच्या गाळ्यासाठी ३ कोटी ८९ लाख खर्ची घातले आहेत. वयाच्या २९ वर्षात आदित्य यांनी इतकी संपत्ती कशी काय कमावली? याविषयी कुतुहलाने चर्चा होत आहे.

६.५ लाखांची अलिशान बीएमडब्ल्यू
सामान्य दर्जाच्या बीएमडब्ल्यू कारचे बाजारमूल्य सुमारे ३५ लाखांच्या आसपास भरते. २०१० मध्ये नोेंदणी करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कारची घसारा किंमत केवळ ६.५ लाख इतकीच दर्शवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिवहन विभागाच्या घसारा नियमानुसार नऊ वर्षानंतर घसारा मूल्य ५० टक्के इतके नोंदवले जाऊ शकते. म्हणजेच बाजारात हे वाहन १७ लाखांच्या आसपास किमतीत भरते. असे असूनही या वाहनाची किंमत साडेसहा लाख रुपये नोंदण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आदित्यला पाठिंबा देणार्‍या सर्वांचा मी आभारी आहे. यामध्ये मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यांचे नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मनसेचेदेखील आभार व्यक्त केले.

२९ वर्षीय आदित्य ठाकरेंची १६ कोटींची संपत्ती
बँक ठेवी १० कोटी ३६ लाख
बॉण्ड शेअर्स 20 लाख 39 हजार
बीएमडब्ल्यू कार 6 लाख 50 हजार
दागिने 64 लाख 65 हजार
इतर 10 लाख 22 हजार
स्थावर मालमत्ता 4 कोटी 67 लाख

एकूण 16 कोटी 4 लाख 98 हजार 820

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -