घरमहाराष्ट्रपं. उमेश यांना शंकराचार्यांतर्फे ‘ताल रत्न‘

पं. उमेश यांना शंकराचार्यांतर्फे ‘ताल रत्न‘

Subscribe

करवीर पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्यातर्फे दिल्ली घराण्याचे प्रख्यात तबला वादक पं.उमेश मोघे यांना तबला वादन क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल “ताल रत्न “ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली. सासवडमधील मेघ मल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित संगीत सोहळ्यात आचार्य अत्रे सभागृहात हा सोहळा पार पडला. या वेळी शंकराचार्य म्हणाले की, उमेश मोघे यांनी तबला वादन विषयात लिहिलेली ‘संगीत रत्नाकर के ताल’ तत्व आणि ‘देहली का तबला’ ही दोन्ही पुस्तके मी वाचली. त्यावरुन त्यांची संगीत क्षेत्रातील विद्वता कळाली. तसेच त्यांनी दोनशेहून अधिक तबला वादनातील नवीन उत्तमोत्तम रचना तयार केल्या आहेत. ज्या अतिशय दर्जेदार आहेत. त्यांच्या रचना तबला वादन क्षेत्रातील अनेक दिग्गज तबला वादक त्यांच्या सोलो वादन मैफिलींमध्ये सादर करतात. आम्ही मोघे यांना काही प्रश्न विचारले ज्याची समाधानकारक आणि योग्य उत्तर देणारे ते पहिले तबला वादक आहेत, असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना मोघे म्हणाले की, ही पदवी मी माझ्या आईस व पत्नीस अर्पण करतो. याचे सर्व श्रेय माझे गुरू पं.सुधीर माईणकर यांना देतो. शंकराचार्यांनी माझ्या सारख्या संगीत साधकाच्या कामाची दखल घेवून मला पदवी देवून सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. या वेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. संगीत, साहित्य, नाट्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि सासवडचे संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अमोल बेलसरे यांनी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -