घरमहाराष्ट्रराम मंदिर जमीन घोटाळा: ट्रस्ट प्रमुख, योगी आणि मोहन भागवत यांनी खुलासा...

राम मंदिर जमीन घोटाळा: ट्रस्ट प्रमुख, योगी आणि मोहन भागवत यांनी खुलासा करावा – संजय राऊत

Subscribe

आम आदमी पार्टीचे (AAP) राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि सपाचे माजी आमदार तेज पांडे यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं. राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत ट्रस्ट प्रमुखांनी स्पष्टीकरण द्यायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच योगी आदीत्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील खुलासा करावा असं राऊत म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“आपचे खासदार संजय सिंह यांनी सकाळी मला फोन करुन मला माहिती दिली. मी काही दिवस दौऱ्यावर होतो. माध्यमांद्वारे मी संपूर्ण पर्दाफाश पाहिलेला आहे. प्रभु श्रीराम आणि अयोध्याचा लढा हा आमच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांसाठी राजकीय विषय असू शकतो आमच्यासाठी नाही. पण तो घोटाळ्याचा विषय नाही. राम मंदिराचं निर्माण होण्यासाठी जो ट्रस्ट निर्माण करण्यात आला. त्या ट्रस्टवर जे सदस्य आहेत ते भाजपने नेमले आहेत, सरकारच्यावतिने नेमले आहेत. आम्ही असं म्हणत होतो की आमच्या सारख्या संस्थांचा एखाद दुसरा सदस्य नेमला असता तर बरं झालं असतं. पण त्यांनी तसे घेतले नाही आहेत. संपूर्ण जगातून शेकडो कोटी रुपयांचा निधी एका श्रद्धेतून राम मंदिरासाठी दिला आहे. शिवाय, राम मंदिराच्या नावार सामान्य माणसांकडून घरोघरी जाऊन देणग्या घेण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्यावतिने १ कोटी रुपये दिले. हा श्रद्धेतून निधी गोळा झालेला आहे, त्याचा असा गैरवापर होत असेल तर श्रद्धेला काही अर्थच राहणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“जो जमीनीचा व्यवहार संशयास्पद असल्याचा समोर आलं आहे, यासंदर्भात राम मंदिर निर्माण ट्रस्टचे प्रमुख आहेत, त्यांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे. केंद्र सरकारने खुलासा केला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी खुलासा करणं गरजेचं आहे. विश्व हिंदू परिषदेनं खुलासा करायला हवं. सगळ्यात शेवटी ज्यांनी यासाठी लढा दिला आहे, त्यांना हे कळायला हवं की त्याठिकाणी काय होत आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -