घरमहाराष्ट्रनाशिक'आपलं सरकार' केंद्रांकडून विद्यार्थी, पालकांची सर्रास लूट; मात्र, प्रशासनाचे संशयास्पद मौन

‘आपलं सरकार’ केंद्रांकडून विद्यार्थी, पालकांची सर्रास लूट; मात्र, प्रशासनाचे संशयास्पद मौन

Subscribe

नाशिक : शैक्षणिक दाखल्यांसाठी आपलं सरकार केंद्रचालकांकडून विद्यार्थी, पालकांची सर्रासपणे आर्थिक लुटमार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असूनही जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलेले नाही. त्यामुळे या केंद्र चालकांच्या या कृतीला प्रशासनातील अधिकार्‍यांची मूक संमती आहे की काय अशी शंका आता विद्यार्थी, पालक उपस्थित करू लागले आहेत.

महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक दाखले मिळविण्यासाठी आपलं सरकार केंद्रात सध्या गर्दी दिसून येत आहे. वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेश रद्द होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून दाखल्यांसाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. याबाबत ‘माय महानगर’ने प्रकाशझोत टाकत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

- Advertisement -

संबधित अधिकार्‍यांना वेळोवेळी असंख्य तक्रारी निदर्शनासही आणून देण्यात आल्या. मात्र नागरिकांनी अतिरिक्त शुल्क देणे योग्य नसल्याचे जुजबी उत्तर देत नागरिकांनी लेखी तक्रार करण्याचे सांगत तक्रारींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. परंतु जिल्ह्यात एकाही अधिकार्‍याने आपलं सरकार केंद्रात जाऊन तपासणी केल्याचे ऐकिवात नाही. याचा अर्थ एक तर आपलं सरकार केंद्र चालकांकडून अतिशय नियमात कामकाज होत असावे किंवा या केंद्र चालकांच्या कृतीला प्रशासनाचा वरदहस्त असावा अशी शंका निर्माण होते.

जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष

कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे महसूली कामकाजात ते फारसे लक्ष देत नसल्याचेही दिसून येत आहे. म्हणूनच की काय, प्रशासनात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांचेही फावले असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

केंद्रांना मोकळे रान

यापूर्वी निकालाआधीच केंद्र चालकांच्या बैठका घेत त्यांना कामकाजाबाबत सूचित केले जात होेते. तसेच या काळात पथकाची नियुक्ती करत केंद्र तपासणीही केली जात होती. मात्र, यंदा केंद्र चालकांना रान मोकळे करून देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

तक्रारी असल्यास करा ‘माय महानगर’शी संपर्क

शैक्षणिक दाखल्यांसाठी सध्या ‘आपलं सरकार केंद्रात मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लुट थांबावी याकरीता ‘माय महानगर’ने ‘कसले आपले सरकार? सारा पैश्यांचा बाजार ! ’ ही वृत्त मालिका सुरु झाली आहे. ज्या विद्यार्थी, पालकांकडून अधिकचे शुल्क आकारले जात असेल किंवा अन्य तक्रारी असतील तर ९४२१३३८१४८ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -