घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप केव्हाही एकत्र येतील

शिवसेना-भाजप केव्हाही एकत्र येतील

Subscribe

शिवसेना-भाजप केव्हाही एकत्र येतील. मला खात्री आहे, योग्यवेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. मनोहर जोशी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेनेमध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेऊन शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तीन भिन्न विचारसरणीचे हे पक्ष एकत्र आल्यामुळे हे सरकार किती काळ स्थैर्य देणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच नव्या सरकारचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. आघाडीत मंत्रिपदावरून अद्याप एकमत नसल्याचे समजते.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर एएनआयशी बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, आता असे वाटते की छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडे सहन करावे, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहाने सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचे ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मते गोळा करण्याच्या निमित्ताने, पक्ष विस्ताराच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपाच्याबाबतीत झाले आहे.

याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असे नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे. संसदेत मांडण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना पुन्हा भाजपसोबत गेल्याचे दिसून आले आहे. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. मात्र राज्यसभेत विधेयकाला विरोध करणार असल्याचे सुतोवाचही शिवसेनेकडून करण्यात आले आहे. मात्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली गेल्यास शिवसेना नेमके काय करणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -