घरमहाराष्ट्रराज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अंतर्गत २० गुण

राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अंतर्गत २० गुण

Subscribe

भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेसाठी 80 व अंतर्गत परीक्षेसाठी 20 गुण देण्याचा निर्णय गुरुवारी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केला. विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द केल्याने घसरलेल्या निकालामुळे विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. यंदाच्या परीक्षेत राज्य बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद केल्याने निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

अनेक विद्यार्थी काही गुणांसाठी अनुत्तीर्ण झाले. निकालाचा टक्का घसरल्याने अन्य बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जोरदार चुरस लागली. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द केल्याने विद्यार्थ्यांना 90 टक्के ओलांडणेही मुश्लिक झाले. याउलट अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. तिसर्‍या फेरीनंतरही कट ऑफ 90 टक्क्यांवर राहिल्याने राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित कॉलेजमधील प्रवेश दूरच राहिला आहे.

- Advertisement -

दहावीच्या निकालात घट झाल्याने विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केल्याने शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीच्या विषय योजना, मूल्यमापन योजना (परीक्षा पध्दती) तसेच अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम, विषय योजना, मूल्यमापन योजनांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याना स्पर्धात्मक परीक्षांना सक्षमतेने सामोरे जाता यावे यासाठी काही शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून नववी व दहावीसाठी भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेव्दारे 80 व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री डॉ. आशिष शेलार यांनी दिली.

बारावीची परीक्षा 600 गुणांची
शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता ११ वीसाठी व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वीसाठी अंतिम मूल्यमापन हे 6५० ऐवजी ६०० गुणांचे राहील. पर्यावरण शास्त्र विषयाच्या 50 गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल. तसेच पर्यावरण शास्त्र विषयामध्ये ‘जल सुरक्षा’ हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री डॉ. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

- Advertisement -

‘जलसुरक्षे’चा प्रथमच अभ्यासात समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलसुरक्षा’ हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला आहे. त्यामुळे त्याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला. इयत्ता नववी ते १२ वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

प्रमुख तरतूदी
<लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट
<भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे
<दहावीची अंतिम परीक्षा ही केवळ दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
<भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये सीबीएसईप्रमाणे श्रवण व भाषण कौशल्याचा समावेश.
<११ वी, १२ वीसाठी अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा
<११ वी, १२ वीसाठी संपूर्ण अभ्यासक्रमावर वार्षिक परीक्षा आधारित
<सीबीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणार अंतर्गत गुण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -