घरमहाराष्ट्रठाकरे V/S फडणवीस...लढाई कुटुंबियांपर्यंत

ठाकरे V/S फडणवीस…लढाई कुटुंबियांपर्यंत

Subscribe

‘तुमच्या कुटुंबियांचे व्हॉटसअ‍ॅप चॅट आमच्याकडेही आहेत, तेव्हा जपून ’

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना कुटुंबावरून घेरले

कुटुंब वाचविण्यासाठी विरोधी पक्षांच्या बैठकीला जात असल्याची टीका करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी समाचार घेतला. शिवसैनिकांना सांगूनच आपण पाटण्याला गेलो होतो, असे सांगत फडणवीसांनी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नये. परिवार तुम्हालाही आहे. तुमच्या परिवाराचेसुद्धा व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर येत आहेत आणि आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललेलो नाही. तुमच्या परिवारावर बोललो तर तुम्हाला फक्त शवासन करावे लागेल. वेगळी कोणती आसने झेपणार नाहीत. नुसते पडून राहावे लागेल, असा जबरदस्त टोला ठाकरे यांनी लगावला. ठाकरे गट येत्या १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दादरच्या शिवाजी मंदिरात शाखाप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. सर्व शिवसैनिक माझे कुटुंब आहेत. ते मी जपणार असून ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरे कोण घेत असेल तर तुम्हाला माहिती. तेव्हा परिवार बचाव वगैरे काही बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला.

- Advertisement -

मेहबूबा मुफ्तींंच्या बाजूला बसलोय म्हणून टीका करीत असाल तर मग असे फोटो माझ्याकडेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही? नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत. मी माझ्याकडे अल्बमच करून ठेवलाय, पण मी मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दामच जाऊन बसलो. कारण त्या भाजपच्या लाँड्रीत स्वच्छ झाल्या आहेत. त्यामुळे बाजूला बसलेले सर्वच स्वच्छ होतील. तुमच्याबरोबर गेला तो स्वच्छ, असे सांगत आम्ही जेव्हा विचारत होतो तेव्हा मिरच्या का झोंबत होत्या. आम्ही हिंदुत्व सोडले म्हणत होता, मग तुम्ही त्यांच्यासोबत बसला होता तेव्हा तुमचे हिंदुत्व सुटले होते का? मग आमचे हिंदुत्व कसे सुटेल, असा सवाल करीत आम्ही तुमच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

ठाणे, पुणे पालिकेसह पीएम केअर निधीची चौकशी करा- उद्धव ठाकरे

- Advertisement -

कोरोना काळात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेची आणि अधिकार्‍यांची चौकशी करणार असाल तर बिनधास्त करा, पण त्याचबरोबर ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर महानगरपालिका आणि पीएम केअर निधीची आणि तुमच्यात हिंमत असेल तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांच्या कारभाराची चौकशी करा, असे आव्हान शिवसेना (उद्धव बळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सरकारला दिले.

ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे ते आमची काय चौकशी करणार, असा सवाल करीत या देशामध्ये हुकूमशाह उभा राहत आहे. आमच्यासमोर असलेल्या या सैतानाला आता गाडावेच लागेल, त्याला संपवावेच लागेल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे गटाकडून येत्या १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दादरच्या शिवाजी मंदिरात पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीवर परखड भाष्य केले. यावेळी त्यांनी पीएम केअर निधीवरून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी जरूर करा. आम्ही चौकशीला घाबरत नाही, पण त्यावेळी एपिडेमिक अ‍ॅक्ट लागू होता. पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणला होता. अर्थात अशा आणीबाणीच्या परिस्थितीत नियमांच्या पलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवण्याला तुम्हाला प्राथमिकता द्यावी लागते आणि ती आपण दिली, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले. भिकेला लागलेले बाहेरचे उपरे मुंबईत येऊन मोठे झाले, पण ते सर्व उपरे, दलाल महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन मराठी माणसांवर दादागिरी करतात. त्यांनी तक्रार केल्यानंतर सोन्यासारख्या मुंबईची अब्रू काढता, असा संताप व्यक्त करीत पोलिसांनाही सांगतो की तुम्ही जनतेची चाकरी करीत आहात. कोणत्याही राजकीय पक्षाचे नोकर म्हणून वावरू नका. इकडे जातोस का, तिकडे जातोस का, हे तुमचे काम नाही, असे ठाकरे यांनी सुनावले.

पीएम केअर निधीत टाटांनी एकरकमी दीड हजार कोटी रुपये दिले होते, पण पीएम केअर निधी चौकशीच्या फेर्‍यात येत नाही, असे सांगताना तो काय हास्य जत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड आहे का, असा सवाल करीत उद्धव ठाकरेंनी जोरदार खिल्ली उडवली. इथल्या काही भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही महाराष्ट्रात पैसे न देता प्रभाकर मोरे केअर फंडला पैसे दिले. मग ते पैसे गेले कुठे? तिथे लाखो, कोट्यवधी रुपये गोळा झाले. केंद्राने महाराष्ट्राला दिलेले व्हेंटिलेटर्स बिघडलेले होते. हे कोणाचे पाप आहे ? ते कोणी खरेदी केले होते, असे सवाल करीत तुम्ही आमची चौकशी जरूर करा, पण आम्हीही तुमची चौकशी करणार, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

‘तुमच्या घरात घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही’

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. परिवारावर येऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणीस यांना दिला होता. त्याला फडणवीस यांनी शनिवारी ट्विट करून उत्तर दिले. तुमचे हिंदुत्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करून जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार आहेत. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील हे समजणारदेखील नाही.

(नड्डे म्हणजे घसा), तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते, असा टोला फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे यांना लगावला. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे. ज्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटबाबत तुम्ही बोलताय ते आरोपपत्राचा भाग आहे. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही, असा पलटवार त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -