घरमहाराष्ट्रराज्यात मान्सूनचे दणक्यात आगमन

राज्यात मान्सूनचे दणक्यात आगमन

Subscribe

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोकण, नाशिक, मराठवाड्यात मुसळधार पाऊस,गोवंडीत नाल्‍यात पडून दोघांचा मृत्‍यू ,पुढील ५ दिवस पाऊस सक्रीयच

हवामान विभागाच्या अंदाजानंतरही मागील २ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनचे अखेर शनिवारी राज्यात दणक्यात आगमन झाले. मुंबई, ठाणे, रायगडसह पुणे, कोकण, नाशिक, मराठवाड्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी बरसल्यामुळे मुंबई-ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली. पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रमाण लक्षणीय होते. दादर, हिंदमाता, सायन, वांद्रे, अंधेरी येथे काही प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.

येत्या ४८ तासांत मान्सून मुंबईत सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे, तर पुढील ५ दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळने वर्तवला आहे. दरम्यान, अपुर्‍या नालेसफाईची पोलखोल पहिल्याच पावसात झाली. नाल्यामध्ये बुडून गोवंडी शिवाजीनगर येथील नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सायंकाळी घडली.

- Advertisement -

शुक्रवारी मुंबईत पावसाची रिमझिम सुरू झाली. रात्री थोडाफार बरसल्यानंतर शनिवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पावसाने मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पुढील ५ दिवसांत मान्सून सक्रिय होणार आहे. यानुसार कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गला यलो अलर्ट 
मुंबईत पुढील ३ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. ठाणे आणि पालघर-मध्येही पुढचे ५ दिवस मुसळधार पाऊस पडेल, तर रायगडमध्ये २५ ते २८ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार (यलो अलर्ट) पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीत २४ ते २६ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

- Advertisement -

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
शनिवारी दुपारनंतरच्या मुसळधार पावसाने काही तासातच मुंबईची तुंबई केली. दादर, परळ, अंधेरी, मालाड, बोरीवली, कुर्ला, चेंबूर, मुलुंड, गोवंडीसह ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. अपुर्‍या नालेसफाईमुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले होते. अंधेरी सबवेत पाणी शिरल्याने काही काळ बंद ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -