घरमहाराष्ट्रसूर्य तापला, राज्यात उष्माघाताचे ७ मृत्यू

सूर्य तापला, राज्यात उष्माघाताचे ७ मृत्यू

Subscribe

राज्यात उष्माघाताचे ७ मृत्यू तर, फक्त दिड महिन्यात २५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात सूर्याचा पारा वाढला असून तापमानाचा जोर कायम आहे. राज्यात अनेक परिसरातील पार्याने चाळीशी गाठली आहे. यामुळे, वेगवेगळ्या आजारांसोबत उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात उष्माघाताचे ७ मृत्यू तर, फक्त दिड महिन्यात २५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

त्यातच महाराष्ट्रावर सध्या पाण्याचं संकट आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने आधीच त्रस्त असलेल्या जनतेला आता पाणी टंचाईलाही सामोरं जावं लागणार आहे. वाढत्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताची समस्या होत आहे. याच समस्येतून १५ मार्चपासून आतापर्यंत ७ जणांचा जीव गेला आहे. तर, २५६ लोकांवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

सर्वात जास्त रुग्ण नागपूरमध्ये

अकोला, नागपूर, बीड, धुळे , औरंगाबाद या जिल्ह्यातील लोकांसाठी वाढलेलं ऊन ही सर्वात मोठी समस्या आहे. राज्यात सर्वात जास्त हिटस्ट्रोकचे रुग्ण हे नागपूरमध्ये आढळले आहेत. नागपूरमधील १०७ रुग्णांना वेगवेगळ्या उष्माघाताच्या समस्येमुळे दाखल केलं गेलं आहे. त्यापाठोपाठ अकोल्यात १०३ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर, लातूर आणि नाशिक मध्ये ही रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार (१५ मार्च, २०१९ ते २ मे, २०१९ पर्यंत)

विभाग                  रुग्ण

- Advertisement -

नागपूर                 १०७

अकोला                 ९९

लातूर                   ३८

औरंगाबाद              ०६

नाशिक                 ०६

एकूण                   २५६

याविषयी अधिक माहिती देताना राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, “ राज्यात वाढत्या तापमानामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची प्रकरणं वाढत आहेत. नागपूरमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्याामुळे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सर्व संस्थांना आम्ही सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची आरोग्य सेवा प्रणाली सज्ज राहावी हा यामागील उद्देश आहे. गॅस्ट्रोएन्टेरायटिस असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.”

मुंबईची आर्द्रता जास्त 

राज्याचा पारा वाढलेला असताना मुंबईकरांनाच्याही अंगाची लाही लाही झाली आहे. सध्या तरी मुंबईचा पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअस एवढा आहे. सोबतच, वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने हवेत गारवा जाणवत नाही. त्यामुळे, घराच्या बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर करतात.

हिट स्ट्रोकपासून कसा बचाव कराल? 

  • जास्तीत जास्त पाणी प्यावे
  • हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा.
  • उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकावा.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते हे पाहून ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक प्यावे.

त्यासोबतच बाहेर पडताना काळ्या कपड्यांचा वापर टाळावा. सुती आणि हलके कपडे वापरावे, जास्तीत जास्त पाणी प्यायलं पाहिजे. उन्हात काम करणाऱ्यांनी संध्याकाळी काम केलं पाहिजे. डोक्यावर रुमाल, छत्रीचा वापर करावा. चहा , कॉफीचे सेवन टाळावे, नारळ पाणी, लिंबू पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करावे. जास्त डिहायड्रेशन झालं असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरु करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -