घरमहाराष्ट्रबरे झाले माझ्यापासून दूर गेले

बरे झाले माझ्यापासून दूर गेले

Subscribe

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला,शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यावर विचारले असता, बरे झाले ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे आमच्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री कोणीही असले तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली हवी.

मध्यंतरी केंद्राने एका निर्णयात कंत्राटी पद्धतीने सर्व काही करावे असे सांगितले होते. त्यावर मी, असे असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीने का नेमू नयेत अशी विचारणा केली होती. कंत्राट काढा आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची नियुक्ती करा, असे माझे वाक्य होते, असे स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज साखरे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती करण्यात आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

गेली २५ ते ३० वर्षे आम्ही हिंदुत्व एके हिंदुत्व या एका विचाराने भाजपसोबत युती केली. संघाचे म्हणायचे झाले तर त्यांची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय असे वाटते का? संघ ही त्यांची मातृसंस्था आहे आणि तिचा विचारच तो पक्ष मानत नसेल तर माझ्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारायला हवी की संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? मान्य असेल तर ते तसे वागताहेत का? भागवतांनी मागील दोन-चार वर्षांत जी मते मांडली आहेत त्यानुसार भाजप वागते आहे का? असे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

आज संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणे, प्रादेशिक पक्ष, इतर पक्ष संपवून टाकणे यालाच लोकशाही म्हणणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की, आता संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. त्यानुसार शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती करण्यात आल्याची घोषणा करतानाच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी इतिहास घडवू आणि मराठी माणसाला असलेल्या दुहीच्या शापालाच गाडून टाकू, असे सांगितले.

- Advertisement -

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज साखरे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई हेही उपस्थित होते. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा ब्रिगेडने व्यक्त केली होती. त्यांचा हा प्रस्ताव शिवसेनेने मान्य केला.

या युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजी बिग्रेडच्या लढवय्या सहकार्‍यांचे स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवते आहेत. आमची हिंदुत्वाविषयीची भूमिका रोखठोक आहे, महाराष्ट्राविषयीची भूमिका रोखठोक आहे. ती तुम्हाला पटली म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात. मला पक्की खात्री आहे की ही युती ती केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून झालेली नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जर झाली असती तर आताच्या काळात तुम्ही आला नसतात. आम्ही सत्तेत होतो, पण आता काही नसताना तुम्ही शिवसेनेसोबत आलेला आहात. लढताना जे सोबत येतात त्यांची साथ महत्त्वाची असते.

महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलं जातेय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे हे योग्य नाही, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली.

संभाजी ब्रिगेडची विचारधारा वेगळी असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, गेली अडीच वर्षे किंवा आज जे काही घडलं ते नसतं घडलं तर पाच वर्षे आम्ही काँग्रेससोबत यशस्वीपणे सरकार चालवून दाखवत होतो. त्याही वेळी काँग्रेसचा सर्वधर्म समभाव आणि आमचे हिंदुत्व असे धोरण असताना सरकार चालले. त्यामुळे विचाराचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. यात मतभिन्नता किती आहे, यापेक्षा मतैक्य किती याला महत्त्व आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी एक समन्वय समिती नेमली होती आणि सर्वांसाठी योग्य अशी भूमिका घेतली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

मराठी माणसाला जो दुहीचा शाप आहे तो मी गाडण्याची सुरुवात केली आहे. यात्रा म्हणा, दौरा म्हणा, मी महाराष्ट्र फिरणार आहे. तूर्त मातोश्रीवर येणारी गर्दी थोडी कमी केली आहे. आता सणांचे दिवस आहेत. लोक दोन वर्षांच्या कोरोनानंतर आनंदाने सण साजरे करीत आहेत. शेतकरीही काही दिवसांत आपली कामे पूर्ण करतील. या सर्वांचा अंदाज घेऊन दसर्‍याआधी आठवडाभर गटनेत्यांचा मेळावा आणि त्यानंतर दसरा मेळावा घेणार आहे. दसर्‍याच्या सुमारास महाराष्ट्रभर मी फिरणार असून लोकांशी संवाद साधणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे दिघेंचे स्वप्न पूर्ण एकनाथ शिंदे

एक दिवस तरी ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, त्याने संपूर्ण राज्याचा कारभार पहावा, हे दिवंगत आनंद दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादानेच आम्ही ही लढाई जिंकलो, मला अभिमान आणि समाधान आहे की माझ्या गुरूच्या आशीर्वादाने मोठा पल्ला गाठला आहे, असे भावूक उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आनंद मठ आणि शक्तीपीठ येथे जाऊन त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आजही काही लोक म्हणतात की हे सरकार राहणार नाही, मात्र सरकार लोकांचे आहे, कोणाला ते सहन होत नाही. घशाखाली घास उतरत नाही. एकनाथ शिंदे हा डोलारा कसा सांभाळतील अशी धास्ती अनेकांना होती, मात्र आपल्या पोटात आणि ओठात एकच आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच काम करेल. आमचा अजेंडा काहीच नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय आणि राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर -चंद्रशेखर बावनकुळे

भाजपसोबत युती तोडल्यापासून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर भाष्य करताना सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झालेले उद्धव ठाकरे उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही. ज्यांचे अस्तित्व नाही, असेच सहकारी त्यांना मिळतील. संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसकाबार सोडला आहे. उद्धव ठाकरे यांचा वाईट काळ जवळ आला आहे. त्यांना शेवटची घरघर लागली आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी लगावला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना तरी मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धवजी यांची ही धडपड तर नाही ना? या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत बेईमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदूविरोधी आघाडी जन्मास आली, परंतु उद्धव यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही; म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -