घरमहाराष्ट्रनवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर

नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कायम आक्रमक असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या खासदारकीचा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे, पण आता त्यांच्या जन्मतारखेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. तीन तारखा समोर आल्याने त्यांचा जन्मदिवस नक्की कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासदार नवनीत राणा यांचे शालेय शिक्षण कुर्ला येथील कार्तिका हायस्कूलमध्ये झाले आहे. त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्यांची जन्मतारीख ६ एप्रिल १९८५ आहे. त्यांचे पती रवी राणा यांनीदेखील नुकत्याच केलेल्या ट्विटवर त्यांची जन्मतारीख हीच सांगितली आहे, तर अन्य एका कागदपत्रावर त्यांची जन्मतारीख १५ एप्रिल १९८५ अशी नोंदवण्यात आली आहे. माहितीचा विश्वासार्ह स्रोत समजल्या जाणार्‍या विकिपिडीयावर मात्र त्यांची जन्मतारीख ३ जानेवारी १९८६ दाखविली आहे.

- Advertisement -

सार्वजनिक जनादेशाचा अपमान करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून विचलित झाल्याने शिवसेनेमध्ये हिंदुत्वाची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित करायची असल्याचे सांगत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे खासदार नवनीत राणा यांनी गेल्या वर्षी जाहीर केले. त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तेव्हापासून खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

त्यातच खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरूनही वाद सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणार्‍या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्ज देताना दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीसंदर्भात दिलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता जात प्रमाणपत्राप्रमाणेच त्यांच्या जन्मतारखेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

वाढदिवसानिमित्त हनुमान चालिसा पठण
श्री हनुमान जयंती आणि खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे गुरुवारी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनीत राणांसह आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -