घरदेश-विदेशभ्रष्टाचारविरोधी कारवाईमुळे विरोधक निराश-पंतप्रधान नरेंद्र मोदी

भ्रष्टाचारविरोधी कारवाईमुळे विरोधक निराश-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

भाजपकडून देशात नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व, इतर पक्षांकडून घराणेशाही, जातीवाद, प्रादेशिकतेचे राजकारण

भ्रष्टाचार उघड होत असल्यामुळे विरोधक निराश झाले आहेत. एवढे निराश झालेत की त्यांना एकच मार्ग दिसत आहे. ते आता उघडपणे माझी कबर खोदण्याची भाषा करीत आहेत. ते मला धमकी देत आहेत, पण दलित, आदिवासी, महिला, माता, तरुण आणि गरीब लोक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तेच भाजपचे कमळ फुलवत असल्याचे या लोकांना माहीत नाही. राक्षसांचा सामना करताना हनुमान कठोर झाले. अशाच प्रकारे भ्रष्टाचार, घराणेशाहीशी लढायचे असेल तर कठोर व्हावे लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांतील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी भाजपच्या ४४व्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भाजप देशात एका नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व करीत आहे, तर काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती आपण पाहू शकता. देशातील इतर पक्ष कुटुंबवाद, घराणेशाही, जातीवाद आणि प्रादेशिकतेचे राजकारण करीत आहेत, तर प्रत्येक देशवासीयाला सोबत घेण्याची भाजपची राजकीय संस्कृती आहे. सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास, हा मंत्र घेऊनच भाजप मार्गक्रमण करीत आहे. देशाच्या नावावर राजकारण करणे ही भाजपची संस्कृती नाही. भारताचे संरक्षण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. भारताच्या संरक्षणासाठी कठोरातील कठोर पाऊल उचलण्यात भाजप मागेपुढे पाहणार नाही.

- Advertisement -

इंग्रज १९४७ मध्ये निघून गेले असले तरी ते जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता येथेच काही लोकांच्या डोक्यात सोडून गेले. परिणामी स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये देशात असा वर्ग मोठा झाला जो सत्तेला आपला जन्मजात हक्क समजत होता. या लोकांच्या बादशाही मानसिकतेने देशाच्या जनतेला नेहमीच आपले गुलाम मानले, असे मोदींनी सांगितले.

२०१४ मध्ये या दबलेल्या, शोषित-वंचित वर्गाने आपला आवाज उठवला. बादशाही मानसिकतेचे लोक या वर्गाचा आवाज ऐकणे तर सोडून द्या पण पायदळीच तुडवत राहिले. त्यामुळेच आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच बादशाही मानसिकतेच्या लोकांनी शोषित, वंचित, दलित, मागास लोकांची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. २०१४ आधी या देशात बादशाही मानसिकता होती. नवे सरकार आल्यावर आम्ही अनेक योजना हाती घेतल्या. मी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियान आणि महिलांसाठी शौचालये बांधण्याची घोषणा केल्यावर काँग्रेसने माझ्यावर टीका केली. हे द्वेषाने पछाडलेले लोक आहेत. वारंवार खोटे बोलत आहेत. हे लोक एवढे हताश झाले आहेत की ते सातत्याने द्वेष निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

परिवारवाद, वंशवाद हीच काँग्रेसची ओळख
काँग्रेसचे लोक वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, प्रादेशिकतावादाचे बंदी झाले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्ने बघायची आणि त्याहून छोटे यश मिळवून आनंद साजरा करायचा आणि एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपसाठी राष्ट्र प्रथम हाच मूलमंत्र आहे. सब का साथ, सब का विकास ही भाजपची कार्यशैली आहे. जेव्हा भ्रष्टाचार, कौटुंबिक वाद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी भाजप संकल्पबद्ध होतो. या सर्वातून मुक्त करण्यासाठी कठोर व्हायला लागले तर भाजप कठोरसुद्धा होतो, असा इशाराही यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -