घरमहाराष्ट्रपरमार आत्महत्या प्रकरणाची फाईल रिओपन होणार?

परमार आत्महत्या प्रकरणाची फाईल रिओपन होणार?

Subscribe

वाझे यांच्या मोबाईलवरून ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांना धमकीचे फोन?

स्फोटकांच्या स्कॉर्पिओ प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर वाझे यांच्या एक-एक भानगडी बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यातूनच ठाण्यातील बहुचर्चित सूरज परमार आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन झाल्यास वाझे यांच्या डोकेदुखीत आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाण्यातील एम. सी. एच. आय या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष आणि बिल्डर सूरज परमार यांनी 7 ऑक्टोबर 2015 रोजी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सविस्तर चिठ्ठी लिहून त्यामध्ये ठाण्यातील काही बड्या राजकीय नेत्यांनी तसेच ठाणे महापालिकेतील कथित गोल्डन गँगमधील काही नगरसेवकांनी बांधकाम व्यवसाय करताना, बांधकामाच्या विविध परवानग्या मिळवताना त्यांना कसा त्रास दिला होता. या परवान्यांच्या मोबदल्यात कशी खंडणी वसूल केली याचा सविस्तर उल्लेख या चिठ्ठीमध्ये परमार यांनी मांडला होता. चिठ्ठीमध्ये नमूद केलेल्या मंडळींच्या मानसिक आणि आर्थिक मागण्यांना कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे परमार यांनी या चिठ्ठीत म्हटले होते. पोलीस दलातील सुत्रानुसार या चिठ्ठीमध्ये परमार यांनी एकूण 34 व्यक्तींची नावे शॉर्टफॉर्ममध्ये लिहिली होती. या प्रकरणाचा तपास करणार्‍या ठाणे पोलिसांनी या सर्व संशयित व्यक्तींची चौकशी केली आणि ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आढळून आले अशा एकोणीस जणांविरोधात कारवाई केली होती. मग चिठ्ठीत नमूद असलेल्या अन्य 16 जणांना पोलिसांनी का वाचवले? कुणाच्या सांगण्यावरून अथवा दबावावरून अन्य सोळा जणांना वाचवण्यात आले? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -

सूरज परमार प्रकरण घडत असताना ठाण्यात अतिवरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकार्‍याने सचिन वाझे यांच्या मोबाईलवरून ठाणे महापालिका, महसूल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथील काही वरिष्ठ अधिकार्‍यांना आणि ठाण्यातील काही बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांना फोन करून परमार यांच्या चिठ्ठीमध्ये त्यांच्याही नावाचा उल्लेख असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे समोर येत आहे. यातूनही वाझे आणि पोलीस दलातील त्या अतिवरिष्ठ अधिकार्‍याने मोठ्या प्रमाणावर कमाई केल्याचे समजते. त्यामुळेच सूरज परमार यांच्या कथित आत्महत्येची फाईल पुन्हा ओपन झाल्यास अनेक कृष्णकृत्यांवर प्रकाश पडेल असे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार सुरेश परमार आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे धाडस दाखवणार का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -