घरमहाराष्ट्रWinter Session : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेणार, विधानसभेत सरकारची घोषणा

Winter Session : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेणार, विधानसभेत सरकारची घोषणा

Subscribe

मुंबईतील दुरूस्ती योग्य म्हणजे सी-2 या वर्गातील इमारतींचा सी-1 अर्थात अतिधोकादायक गटात समावेश करण्यात आला असेल तर अशा अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती नगरविकास विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

नागपूर : मुंबईतील दुरूस्ती योग्य म्हणजे सी-2 या वर्गातील इमारतींचा सी-1 अर्थात अतिधोकादायक गटात समावेश करण्यात आला असेल तर अशा अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती नगरविकास विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याशिवाय धोकादायक इमारतींच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार समितीत तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. (Winter Session: Government announcement in Legislative Assembly to review dangerous buildings in Mumbai)

हेही वाचा – Winter Session : राज्यातील बसस्थानकांचे होणार नुतनीकरण, MIDC सोबत 600 कोटींचे सामंजस्य करार

- Advertisement -

मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील मेहता महल या इमारतीबाबत शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश कुडाळकर यांनी आज प्रश्न विचारला होता. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सामंत यांनी मेहता महाल या इमारतीचा समावेश मुंबई महापालिकेने दुरुस्ती योग्य असलेल्या सी-2 वर्गातून अतिधोकादायक इमारत म्हणजे सी-1 मध्ये केलेला नाही. आयआयटीच्या तज्ज्ञांनी या इमारतीचे सर्वेक्षण करून तिचा सी-1 मध्ये समावेश केला. त्यामुळे येथील रहिवाशी न्यायालयात गेले असून न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारतीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मंत्र्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईत अतिधोकादायक 210 इमारती आहेत. या इमारती खरेच धोकादायक आहेत का, याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबत आयआयटीच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागविण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सी-2 वर्गातील इमारती सी-1 वर्गात आणणारे मोठे रॅकेट मुंबई महापालिकेत कार्यरत असल्याचा आरोप केला. हा मोठा घोटाळा असून यासंदर्भात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी इस्माइल बाग या इमारतीविषयी कोणतीही तक्रार नसताना महापालिकेने ती इमारत अतिधोकादायक म्हणून जाहिर करून तिला नोटीस बजावल्याचे सांगितले. भाजपाच्या योगेश सागर यांनी धोकादायक इमारत ठरविणारी मुंबई महापालिकेची तांत्रिक समिती बोगस असल्याची टीका केली. इमारत ज्या वर्गात हवी त्या वर्गात ही समिती दाखवते. त्यामुळे तांत्रिक सल्लागार समिती बरखास्त करून व्हीजेटीआय, आयआयटी आणि सरदार पटेल टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांची समिती नेमावी. यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश करू नये, अशी सूचना केली.

- Advertisement -

या चर्चेवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सी-2 मधील इमारतींची दुरुस्ती करून त्यांचे आयुर्मान वाढविता येते. मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरूस्तीसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने 450 ते 500 कोटी रुपयांचा निधी म्हाडाला इमारत दुरुस्तीसाठी द्यावा, अशी सूचना केली. त्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, अमित देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, रवींद्र वायकर, भाजपच्या मिहिर कोटेचा आदींनी उपप्रश्न विचारले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -