घरमहाराष्ट्रपंतप्रधानांनी सत्कार केलेल्या महिला स्वच्छता दूताची उपेक्षा

पंतप्रधानांनी सत्कार केलेल्या महिला स्वच्छता दूताची उपेक्षा

Subscribe

जिल्हा स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची व्यथा

गर्भवती असताना हातात पहार घेऊन खड्डा खणून तीन दिवसात शौचालय उभारणार्‍या जव्हारमधील सुशीला खुरकुटे यांना जिल्हा स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, इतके होऊनही पोटाची खळगी भरण्यासाठी सुशीलांचे कुुटुंब आजही रोजगाराच्या शोधात भटकंती करीत आहे. अखेर सुशीला यांनी मोदींना साकडे घालून कायमस्वरुपी रोजगार देण्याची याचना केली आहे.

पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील सुशीला खुरकुटे यांच्या जिद्दीची कहाणी 2017 मध्ये खूपच गाजली होती. गावातील इतर महिलांप्रमाणेच सुशीला यांना उघड्यावरच शौचालयाला जावे लागायचे. स्वच्छता असेल तर मुलांचे कुटुंबाचे आरोग्य जपता येईल. हा विचार सुशीला यांच्या मनात आला. पण, मजूर लावून खड्डा खोदण्याची ऐपत त्यांच्याकडे नव्हती. पतीची मदत घ्यायची तर रोजगार बुडून घरात खायचे वांदे व्हायचे. गर्भवती सुशीलांनी मग स्वतः पहार घेऊन खड्डा खोदण्याचे काम सुरु केले.

- Advertisement -

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणत आहे. मधूनच क्षणभर विसावत घाम पुसते. पुन्हा एकाग्रतेने काम सुरू. तीन दिवस काम करून ती हा खड्डा पूर्ण करते. पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर शौचालय उभे राहिले. ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबाईंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो ट्विट केला आणि चक्रे फिरली. मोदी सरकारने तात्काळ मदत करत सुशीला यांचे शौचालय बांधून पूर्ण केले. शिवाय त्या गावातल्या इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्याच त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या.

पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबाईंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या 15 नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ती सन्मानासाठी निवडले. गुजरातमधील गांधीनगर 8 मार्च 2017 येथे महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला त्या अनेकवेळा माध्यमांसमोर झळकल्या. पण, सत्काराने त्यांच्या कुुटुंबियांच्या रोजगाराचा प्रश्न काही सुटला नाही. सुशीला यांना सरकारी मदत तर सोडाच परंतू स्वच्छतादूत असलेल्या सुशिलाला आजपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यक्रमात देखील बोलावण्यात आलेले नाही. शासनाकडून कोणतीच मदतदेखील मिळालेली नाही. या कुटूंबाचा रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा लाभ देखील सुशिलाच्या कुटूंबाला मिळालेला नाही. दरवर्षीच सुशीलाच्या कुटूंबियांना रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते.

- Advertisement -

सुशीला खुरकुटे या त्यांच्या तोडक्या – मोडक्या बोली भाषेत आपलं महानगरशी बोलल्या. ‘मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवले. हे तू चांगले केले. परंतु मला काम दिले नाही. काम दिले असते तर मला माझ्या लहान लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावे लागले नसते. म्हणून तू मला काम दे’ जणू काही साकडेच त्यांनी पंतप्रधानांना घातले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र त्यांना दादा म्हणणार्‍या सुशीलाचे गार्‍हाणे ऐकून तिच्या मदतीस धावून येतील का? तिच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल का? हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -