घरमुंबईधारावीत विद्यार्थ्यांचा उद्रेक!

धारावीत विद्यार्थ्यांचा उद्रेक!

Subscribe

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी आक्रमक, शिक्षणमंत्र्यांच्या घरासह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांचा उद्रेक सोमवारी मुंबईतील धारावी परिसरात बघायला मिळाला. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर निदर्शने करत जोरदार ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मुंबईप्रमाणे नागपूर, अकोला, औरंगाबाद, पुणे आणि उस्मानाबादमध्येही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भातील तारखा जाहीर केल्या होत्या. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील असे जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे म्हणणे न ऐकणार्‍या शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलन करून परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करावी, असे आवाहन ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणजेच विकास पाठक याने यू ट्यूबवरून विद्यार्थ्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने विद्यार्थी रत्यावर उतरले.

- Advertisement -

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरारमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील गोल्ड फिल्ड प्लाझा गेटसमोर एकत्र येऊन जोरदार आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने जमा झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात येत होते. अवघ्या अर्ध्या तासांमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थी जमा झाल्याने या ठिकाणच्या रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होऊन चक्का जाम झाला. या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना पांगवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला.

या आंदोलनावर बोलताना काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील कोरोना आणि परीक्षा असे दुहेरी टेन्शन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत,असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

- Advertisement -

कोरोनामुळे दहावी, बारावीचे वर्ग ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होते. त्यानंतर ऑफलाईन वर्ग सुरू झाले असले, तरी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे डिसेंबरपासून वर्ग पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. कोरोना आटोक्यात आल्याने शाळा पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याची जोरदार मागणी पालकांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. पालकांच्या या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने शाळा जानेवारीमध्ये पुन्हा ऑफलाईन सुरू केल्या. याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात आल्याने परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी, असे काही विद्यार्थ्यांचे मत आहे.

दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 10वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळीच वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केले.

आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत.
-वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. कोरोनाचा प्रसार कमी होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु आता शैक्षणिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळे 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्यात.
– मेहुल राठोड, विद्यार्थी

कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षे आम्ही ऑनलाईन परीक्षा दिलेल्या आहेत. अजून कोरोनाची लाट पूर्णत: ओसरलेली नाही. आजही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. असे असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याची तयारी सुरू करून राज्य सरकार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे. सरकारने विद्यार्थ्यांची भावना समजून घ्यायला हवी.
– आशिष जाधव, विद्यार्थी

शिक्षणमंत्र्यांकडून हिंदुस्थानी भाऊला चर्चेचे आमंत्रण
विद्यार्थी सतत 3 महिने शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागत आहेत. मात्र, त्यांना न्याय न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावल्याचे विकास पाठक याने म्हटले. मुंबईतील आंदोलनानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंदुस्थानी भाऊला चर्चेसाठी आमंत्रण दिले. तर शिक्षण खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आपण चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले.

आंदोलनाच्या चौकशीचे आदेश
राज्यातील विद्यार्थी स्वत:हून रस्त्यावर उतरतील, असे वाटत नाही. राज्यातील विद्यार्थी आंदोलनामागे कोणती तरी शक्ती असली पाहिजे. हे षड्यंत्र ठरवून रचलेले आहे. मी पोलिसांना या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोषींवर लवकरच कठोर कारवाई होईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला. त्यामुळे विकास पाठक याला अटक होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी भाऊनेही अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्या असून, आपल्या वकिलांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करून सरकार मार्ग काढेल. परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये.
-नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

निवेदन न देता आंदोलन करणे अयोग्य. ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या शे-दोनशे इतकी आहे. पण लाखो विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेसाठी आग्रही आहेत.
– बच्चू कडू, राज्यमंत्री, शिक्षण विभाग

लाठीचार्ज केलात, आत्ता केसेस टाकू नका
विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य की अयोग्य, विद्यार्थ्यांना कुणी उकसवले हा चर्चेचा विषय आहे. प्रशासनाला जे वाटेल तो निर्णय प्रशासन परीक्षेच्या तोंडावर घेत आहे. विद्यार्थी-पालकांमध्ये गेली २ वर्षे संभ्रम कायम आहे. विद्यार्थी आनलाईन परीक्षेची मागणी करत असतील तर हा गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांच्या या जमावाला संयमाने हाताळायला हवे होते; पण तसे झाले नाही. आता लाठीचार्ज तर केलात, पण विद्यार्थ्यांवर केसेस टाकू नका.
– रोहित ढाले, कार्याध्यक्ष, छात्रभारती, महाराष्ट्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -