घरमुंबईराजपथ पथसंचलनासाठी राज्यातील १४ विद्यार्थी

राजपथ पथसंचलनासाठी राज्यातील १४ विद्यार्थी

Subscribe

महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनी दिल्लीत सराव करीत आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थिनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणार्‍या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थिनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी या शिबिरात सराव करीत आहेत.

हे शिबिर 31 जानेवारी 2020 पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत योगासने, बौद्धीक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो, अशी माहिती शिबिराचे संचालक डॉ. अशोक श्रोती यांनी दिली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या केंद्र शासनाच्या कार्यक्रमांतर्गत शिबिरामध्ये महाराष्ट्र आणि ओडिशाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या राहण्याची व्यवस्था एकत्र करण्यात आली असून उभय राज्यांतील सांस्कृतिक, सामाजिक आदी विषयी माहिती समजून घेण्यात त्यांना मदत होणार असल्याचेही डॉ. श्रोती यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या चमुत पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची वैष्णवी पटोले, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची तेजस्वीनी वानखेडे, मुंबई येथील एस.बी. वर्तक महाविद्यालयाची संप्रिती जयंता, मुंबई येथील एस.आय.इ.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची नितीशा कदम, औंरगाबाद जिल्ह्यातील वाळुज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाची पूजा पवार, अकोला येथील श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाची सपना सुरेश, मुंबई येथील ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची अक्षता कदम या विद्यार्थिनींचा समावेश आहे, तर मुंबईच्या विरार (पश्चिम) येथील विवा महाविद्यालयाचा पार्थ जानी आणि चर्चगेट येथील के.सी. महाविद्यालयाचा प्रशांत चौधरी, परभणी येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचा पोहनदास तिडके, कोल्हापूर येथील न्यू कॉलेजचा कौस्तुभ लवाटे, औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयाचा रवी जामनीक, परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचा महेश रेंगे आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचा आदित्य माळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासोबतच गोव्यातील म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाची स्वामीनी लोटलीकर या विद्यर्थिनीचा आणि मडगाव येथील दामोदर अर्थ व वाणिज्य महाविद्यालाच्या प्रेमकुमार सिंह या विद्यार्थ्याचा या चमुत समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण 200 पैकी 148 विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 16 विद्यार्थी- विद्यार्थिनींची निवड होईल असा विश्वास महाराष्ट्राच्या चमूचे समन्वयक तथा लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हे एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थिनी भेटणार असून यावेळी सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड होईल,असा विश्वास प्राध्यापक डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात गेल्या एका दशकापासून राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी, आसीफ शेख आणि दर्पेश डिंगर यांनी मिळविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -