घरमुंबईपंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी रस्त्यावर ८१ लाखांचा खर्च?

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी रस्त्यावर ८१ लाखांचा खर्च?

Subscribe

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असली तरी पालिका त्याकडे दुर्लक्ष करते.

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र तरीही येथील रस्त्यांच्या दुरूस्तीकडे पालिकेकडून फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसीय कल्याण दौरा मार्गातील रस्त्यांच्या कामांसाठी पालिका प्रशासनाने तातडीने तब्बल ८१ लाखाचा खर्च केल्याची बाब समोर आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल सहा महिन्यानंतर हा विषय २० जूनच्या महासभेच्या पटलावर माहितीसाठी ठेवण्यात आला आहे.

१८ डिसेंबर २०१८ रोजी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ कॉरिडोरचे उद्घाटन आणि सिडकोच्या ९० हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा भूमिपूजन सोहळा कल्याणमधील लालचौकी येथील फडके मैदानात पार पडला होता. पंतप्रधानांच्या हेलीपॅडचे स्थळ हे बापगाव येथील मैदानात होते. तेथून पंतप्रधान मोदी हे चारचाकीने फडके मैदानापर्यंत आले होते.

- Advertisement -

रस्ता दुरूस्तीसाठी ८१ लाखांचा खर्च

त्यामुळे त्या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात आले होते. त्यातील काही भाग हा सार्वजनिक बांधकाम विभाग तर फडके मैदान ते गांधारी पूलापर्यंतचा परिसर हा महापालिकेच्या अखत्यारित येतो. या रस्त्यासाठी पालिकेने ८१ लाख रूपये खर्च केले. रस्त्यावर लेन मार्किंग, झेब्रा पेंटींग, दुभाजकाला रंगकाम करणे, गांधारी पुलाच्या पोहोच रस्त्याच्या भागात डांबरीकरण, साईड शोल्डरच्या भागात माती भराव, सूचना फलक आदी कामे करण्यात आली होती. उल्हासनगरमधील एम. सी. चंदनानी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ही कामे करून घेण्यात आली होती.
सामान्यांचे समस्येबाबत तत्परता का नाही?

कल्याण-डोंबिवलीकर खड्डयांच्या समस्येने नेहमीच त्रस्त असतात. प्रत्येक पावसाळयात खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. पंतप्रधान आल्यानंतर ज्या तातडीने पालिकेने रस्ते चकाचक केले. तीच तत्परता पालिका प्रशासन इतरवेळी का दाखवत नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -