घरमुंबई४५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयामुळे १५ वर्षाच्या मुलाला जीवदान

४५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयामुळे १५ वर्षाच्या मुलाला जीवदान

Subscribe

मुंबईतील २०२१ चे पहिले पेडिएट्रिक हृदय प्रत्यारोपण यशस्वी; लवकरच देणार दहावीची परीक्षा

मुंबईतील २०२१ मधील पहिले हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २२ जानेवारीला फोर्टिस रुग्णालयामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे १५ वर्षाच्या मुलाच्या शरीरात ४५ वर्षीय व्यक्तीचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. कॅटास्ट्रोफिक पोस्टेरिअर सर्क्युलेशन इनपाफर्क्टने (इस्केमिक स्ट्रोक) पीडित व्यक्तीचा ब्रेन डेड झाल्यामुळे त्याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. यामुळे फोर्टिस रुग्णालयातच उपचार घेत असलेल्या दहावीच्या मुलाला हृदय मिळाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. दहावीची परीक्षा देता येणार असल्याने मुलगा आनंदी असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

मुंबईत व्यावसायिक असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला कॅटास्ट्रोफिक पोस्टेरिअर सर्क्युलेशन इनपाफर्क्टने (इस्केमिक स्ट्रोक) ग्रस्त असल्याने त्याच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र २२ जानेवारीला त्याचा ब्रेन डेड झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचे अवयवदानाबाबत समुपदेशन केले. त्यानंतर व्यावसायिक व्यक्तीची पत्नी, आई यांनी अवयवदानाला संमती दिल्यानंतर ऑर्गन रिट्रायव्हल व प्रत्यारोपण प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार रुग्णालयातच डायलेटेड कार्डियोमायोपॅथीने या आजाराने पीडित असलेल्या १५ वर्षीय मुलाला हृदय प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. डायलेटेड कार्डियोमायोपॅथी या आजारामध्ये हळूहळू हार्ट फेल्युअर वाढत जाते. रूग्णाच्या भावाचा याच आजारामुळे मृत्यू झाला होता. एक वर्षापासून तो हृदयाच्या प्रतीक्षेत होता. मात्र काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावत चालली होती. त्याचे हृदय निकामी होण्याची शक्यता वाढली होती. कोरोनादरम्यान दाता मिळणे अवघड झाल्याने अवयवदानात घट झाली होती. त्यामुळे १५ वर्षीय मुलासमोर मोठे आव्हान होते. व्यावसायिक व्यक्तीच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या व पालकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला. फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियक सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. धनंजय मालणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्डियक स्पेशालिस्ट्सच्या टीमने १५ वर्षीय विद्यार्थ्याचे यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण केले. वैद्यकीय टीम्स, परिचारिका टीम्स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकमेकांशी समन्वय साधत प्रत्यारोपण यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. १५ वर्षीय मुलाला नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, तो यंदा त्याची बोर्ड परीक्षा न चुकता देऊ शकणार आहे.

- Advertisement -

डायलेटेड कार्डियोमायोपॅथीमुळे माझ्या मोठ्या मुलाचा १३ व्या वर्षी मृत्यू झाला. काही महिन्यांनंतर दुसर्‍या मुलालाही त्याच आजाराचे निदान झाले. मला दुसर्‍या मुलाला गमवायचे नसल्याने मी मदतीसाठी केरळला गेलो. तिथे फोर्टिस रुग्णालयामध्ये हृदय प्रत्यारोपण होत असल्याचे समजले. मी येथील डॉक्टरांना भेटल्यानंतर मला आशेचा किरण दिसला. अखेर माझ्या मुलाला नवीन हृदय, नवीन जीवन मिळाले. आमच्या मुलाचे जीवन वाचवण्यासाठी मी दात्याच्या कुटुंबाचे आभार मानतो, अशा शब्दात मुलाच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाच अवयव केले दान

४५ वर्षीय व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह आणखी काही जणांना जीवदान मिळाले. या व्यक्तीचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. यातील हृदय १५ वर्षाच्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आले. तर यकृत आणि एक मूत्रपिंड फोर्टिसमधीलच एका ५६ वर्षीय महिलेला देण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड दुसर्‍या रुग्णालयात पाठवण्यात आले. दान करण्यात आलेले डोळे आणि त्वचा ही नेत्रपेढी आणि त्वचापेढीला पाठवण्यात आले.

- Advertisement -

५०० मुलांवर होतात हृदय प्रत्यारोपण

जगभरात दरवर्षाला ५००० हृदय प्रत्यारोपण केले जातात, ज्यापैकी जवळपास ५०० प्रत्यारोपण मुलांवर करण्यात येतात. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्ती त्यांचे सामान्य जीवन जगू शकतात, पण त्यांना औषधोपचाराचे काटेकोरपणे पालन करावे लागते आणि रिजेक्शन व इन्फेक्शनसाठी ठराविक कालांतराने चाचणी करावी लागते, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. स्वाती गरेकर यांनी दिली.

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमधून शाळेत जाणारा मुलगा व त्याच्या पालकांना जीवनाबाबत आशेचा किरण मिळाला. मुलाचे हार्ट फेल्युअर अधिक बिकट असण्याच्या अवस्थेमध्ये तो आमच्याकडे भरती झाला होता. अवयवदात्याच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे रूग्णाला जीवनदान मिळाले आहे.
– डॉ. धनंजय मालणकर, वरिष्ठ सल्लागार, पेडिएट्रिक कार्डियक सर्जरी विभाग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -